ठाणे : कवी वैभव जोशी यांच्या लयबद्ध शैलीतल्या कविता, प्रियांका बर्वे यांच्या सुरेल स्वराला लाभलेली वादकांची अप्रतिम साथ आणि या आविष्काराने भारावून गेलेले कल्याणकर असा तिहेरी संगम सोमवारी अत्रे रंगमंदिराने अनुभवला. ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या तिसऱ्या दिवसाचा तो परमोच्च बिंदू ठरला. पण त्याआधी मनस्वास्थ्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांनी दिलेला वाचनसल्ला आणि वैभव जोशी यांच्याच मार्गदर्शनात झालेली कवितेची कार्यशाळा या कार्यक्रमांनी कल्याण-डोंबिवलीकरांचा सोमवार सत्कारणी लावला.

प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिरातून सुरू झालेला ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ तिसऱ्या दिवशी कल्याणमध्ये पोहोचला. इथून पुढे तो ठाण्याचे काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, पार्ल्याचे लोकमान्य सेवा संघ, ठाण्याचे गडकरी रंगायतन असा प्रवास करणार आहे. या प्रवासादरम्यान त्या त्या ठिकाणी दिसणारा उत्साह, उत्सुकता आणि उत्कटता सोमवारी कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात पाहायला मिळाली. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभा थत्ते आणि डॉ. अद्वैत पाध्ये यांनी सकाळच्या पहिल्या सत्रात साहित्य आणि मनस्वास्थ्य यांचा परस्परसंबंध विशद केला. वाचन हा मनाच्या आरोग्यासाठीची उत्तम ‘थेरपी’ असल्याचे त्यांनी सांगितले. दुपारनंतरच्या सत्रात कवी वैभव जोशी यांच्याकडून कवितेचे मर्म जाणनू घेण्यासाठीही कल्याणकर उत्साही दिसले. त्यांचा हाच उत्साह सायंकाळी ‘कवी आणि गायक’ या मैफलीतही दिसून आला. कवी वैभव जोशी आणि गायिका प्रियांका बर्वे यांची अनोखी जुगलबंदी अनुभवण्यासाठी अत्रे रंगमंदिर सभागृहात रसिक श्रोत्यांची गर्दी झाली होती.

‘नांदी’ कवितेने वैभव जोशी यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. समर्पणभावनेने ओथंबलेली ही कविता साऱ्यांच्या अंत:करणाला स्पर्शून जात असतानाच प्रियांका बर्वे यांच्या ‘तुझ मागतो मी आता…’ या वंदनगीताने सभागृहाचे वातावरण भारून टाकले. त्याला आणखी उंचीवर नेले ते बासरीच्या सुरेल लहरींनी. शब्द, स्वर, सुरांचा हा मेळ थांबल्यानंतरही सभागृहाची शांतता क्षणभर दाटून होती.

संगीताचा पुढचा प्रवास ठुमरीच्या नाजूक तरलतेकडे वळला. “बिंदिया ले गयी” या लोकप्रिय ठुमरीने प्रियांका बर्वे यांनी वसंतराव देशपांडे यांच्यावर आधारित चित्रपटातील अप्रतिम रचना सादर केली. त्यांच्या आवाजातील कोमलता आणि भावनांच्या गहिरेपणाने सभागृहातील प्रत्येक कान त्या सुरांवर थबकला. त्यानंतर “नाही मी बोलत नाथा” या नाट्यगीताने रसिकांच्या हृदयावर मोहिनी घातली. या गीतातील भावनांची उधळण आणि त्यांच्या सादरीकरणातील सहजता पाहून रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करत उत्स्फूर्त दाद दिली. तर वैभव यांच्या शब्दरचनांतील खोली सभागृह व्यापून टाकणारी ठरली. एकापाठोपाठ सादर होणाऱ्या कविता आणि गाणी रंगमंदिरात आनंदाचा झंकार निर्माण करत होत्या. कवी वैभव जोशी यांनी सादर केलेल्या त्यांच्या सुप्रसिध्द ‘मन तुझ जलतरंग’ या काव्यरचनेने नेहमीप्रमाणे येथेही रसिकश्रोत्यांची वाहवा मिळवली.

कलावंतांचा सन्मान

या कार्यक्रमात सारस्वत बँकेच्या मृदुला रेगे आणि सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री भारती आचरेकर यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये कवी वैभव जोशी, गायिका प्रियांका बर्वे यांच्यासह संगीत सादरीकरणात कीबोर्डवर विशाल धुमाळ, बासरी वादन निनाद मुलावकर, हार्मोनियमवर अपूर्व पेटकर, ऑक्टोपॅड वरील रोहन वनगे, तबल्यावर निखिल फाटक, तर ध्वनी संयोजनाची जबाबदारी सांभाळणारे प्रशांत कांबळे यांचाही सत्कार करण्यात आला.