आवक वाढल्याने ऐन मार्गशीर्ष महिन्यात स्वस्ताई
दीर्घकाळ रेंगाळलेला पाऊस, त्यानंतर वातावरणात वाढलेला उष्मा अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतीचे झालेले नुकसान व त्यामुळे बाजारात घटलेली आवक या कारणांमुळे मुंबई-ठाण्यातील भाज्या महाग झाल्या होत्या. त्यातच गेल्या आठवडय़ापासून मार्गशीर्ष महिन्याला प्रारंभ झाल्याने भाज्यांच्या दरांत आणखी वाढ होण्याची भीती होती. परंतु, आवक वाढल्याने भाज्यांचे दर जवळपास निम्म्यावर आले आहेत. गेल्या महिन्यात किरकोळ बाजारात शंभरी पार केलेला फ्लॉवर आता ४० रुपये किलोने विकला जात आहे. तर ८० रुपयांना विकली जाणारी कोथिंबिरीची मोठी जुडी आता ४० रुपयांत मिळू लागली आहे.
दिल्ली तसेच उत्तर प्रदेश येथून मटार, गाजर या भाज्यांची आवक वाढल्याने त्यांच्या दरांत २० ते ३० रुपयांची घसरण झाल्याचे किरकोळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण या शहरांना नाशिक आणि पुणे जिल्ह्य़ातील विविध भागांतून भाजी पुरवठा केला जातो. पाऊस लांबल्याने त्याचा भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला. आता मात्र भाज्यांचा पुरवठा वाढल्याने किमती उतरल्या आहेत. मंगळवारी किरकोळीत ८० रुपये किलोने विकली जाणारी सिमला मिरची बुधवारी ६० रुपये किलोने विकली जात असल्याचे ठाण्यातील विक्रेते विवेक भुजबळ यांनी सांगितले.
कांद्याचे भाव मात्र चढेच
कांदे घाऊक बाजारातच ४८ रुपये किलोने विकले जात असून किरकोळीत मात्र कांद्याचा भाव ६० रुपये किलो आहे. कांद्याला अधिक भाव असल्याने ओतूर, जुन्नरकडील शेतकऱ्यांनी काद्यांची लागवड केल्याचे ओतूर येथील शेतकरी गणेश हांडे यांनी सांगितले. यावेळी पालेभाज्यांचे पीकही उत्तम आले असून मेथी, पालक, शेपू, कोथिंबीर आदी पालेभाज्यांचे भावही उतरले असल्याचे ते म्हणाले.