भाऊ जरा चांगली आणि ताजी भाजी द्या…भाजी विकत घेताना हे वाक्य नेहमीच आपल्या तोंडी असतं. भाजी विकत घ्यायची म्हटली तर आपण ती भाजी ताजी आहे की नाही याची सारखी विचारणा विक्रेत्याला करत असतो. कुटुंबाचं आणि आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी डॉक्टरही हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देत असतात. पण तुम्ही विकत घेतलेली भाजी ही गटाराच्या पाण्यात धुतलेली आहे असं कळलं तर नक्कीच मोठा धक्का बसेल. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत भाजी विक्रेता चक्क गटारात पडलेली भाजी उचलून विकत असल्याचा संतापजनक प्रकार दिसत आहे.

भिवंडीत हा किळसवाणा आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. गायत्रीनगर परिसरात हा भाजी विक्रेता भाजी विकण्यासाठी चालला होता. यावेळी त्याची गाडी उलटली आणि भाजपीला गटाराच्या पाण्यात जाऊन पडला. यानंतर त्याने तो भाजीपाला गटाराच्या पाण्यातून उचलला आणि पुन्हा विक्रीसाठी घेऊन जाऊ लागला. व्हिडीओत तो स्पष्टपणे घाण पाण्यातील टोमॅटो उचलून पुन्हा गाडीवर ठेवत असल्याचं दिसत आहे.

यावेळी काही नागरिकांनी हा प्रकार पाहिला आणि मोबाइलमध्ये कैद केला. त्यांनी भाजी विक्रेत्याला जाब विचारला आणि त्याच्या गाडीवरील भाजीपाला कचराकुंडीत फेकून दिला. मात्र या घटनेमुळे आपण घेणारा भाजीपाला किती स्वच्छ आणि ताजा आहे हा प्रश्न सतावणारा आहे.