२०१९मध्ये सव्वादोन लाख वाहनांची खरेदी; २०१८ च्या तुलनेत १२ टक्क्यांनी घट
किशोर कोकणे, लोकसत्ता
ठाणे : मुंबई महानगर क्षेत्रातील वाहनविक्रीच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी घट झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. ठाणे, भिवंडी, नवी मुंबई, मीरा रोड, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर येथील शहरांमधील नव्या वाहनांच्या नोंदणीत २०१८च्या तुलनेत २०१९ मध्ये तब्बल १२ टक्क्यांनी घट झाली आहे. देशभरातील वाहन उद्योगावर मंदीचे सावट असल्याचा हा परिणाम आहे, असे परिवहन विभागातील सूत्रांनी सांगितले.
वस्तू आणि सेवा करामधील जाचक अटी आणि नोटाबंदी यांमुळे वाहनविक्री उद्योगावर प्रतिकूल परिणाम झाल्याची चर्चा वाहन उद्योगात आहे. या उद्योगावर आलेल्या मंदीच्या सावटाचे प्रतििबब ठाणे जिल्ह्य़ातील वाहन नोंदणीवर उमटू लागले असून राज्य सरकारच्या महसुलावरही त्याचा परिणाम दिसू लागला आहे. ठाणे जिल्ह्य़ात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३९ हजार ८७१ वाहने कमी विकली गेल्याची माहिती परिवहन विभागातील सूत्रांनी दिली. जिल्ह्य़ातील ठाणे, वाशी आणि कल्याण या प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये २०१८ या वर्षांत २ लाख ६३ हजार ३७१ वाहनांची नोंद झाली होती, तर २०१९ या वर्षी २ लाख २३ हजार ५०० वाहनांची नोंद झाली आहे.
दिवाळी, गुढीपाडवा यांसारख्या उत्सवाच्या काळातही विक्री अत्यंत कमी होती असे काही वाहन विक्रेते सांगत आहेत. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात २०१८ मध्ये १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत १ लाख २८ हजार ७९०, कल्याणमध्ये ९० हजार ११३ आणि वाशी येथे ४५ हजार १२८ वाहनांची विक्री झाली होती. मात्र २०१९ याच कालावधीत ठाण्यात १ लाख ७ हजार ५७४, कल्याणमध्ये ७८ हजार २२४ आणि वाशीमध्ये ३७ हजार ७०२ वाहनांची नोंदणी झालेली आहे. यामध्ये दुचाकी, रिक्षा, कार यांसारख्या लहान वाहनांची विक्रीही रोडावल्याचे दिसून येत आहे. या वाहनांची विक्री घटल्याने राज्याच्या महसुलावरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे.
वाशी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील महसुलात २०१८ या वर्षीच्या तुलनेत २४.७५ टक्क्यांनी घट झालेली आहे. तर ठाणे ९.९७ आणि कल्याणमध्ये ३. ४३ टक्क्यांनी महसूल घटला आहे. देशात सुरू असलेल्या आर्थिक मंदीची झळ सर्वसामान्यांना पोहोचत आहे. त्यातच ‘मागेल त्याला परवाना’ या धोरणामुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय अर्ध्यावर आलेला आहे. रिक्षाचालकांना बँकेचे हप्ते फेडणे कठीण झाले आहे. त्यामुळे या व्यवसायात नव्याने येण्याचे रिक्षाचालक टाळत आहेत, असे भिवंडी रिक्षाचालक-मालक महासंघाचे महासचिव सुनील चव्हाण यांनी सांगितले.
देशात नोटाबंदीनंतर वाहन विक्रीत घट निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. त्याचा परिणाम २०१९च्या वाहन विक्रीमध्येही दिसून आला आहे. २०१८पेक्षा २०१९च्या वाहनविक्रीमध्ये घट झाली आहे.
– नंदकिशोर नाईक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे.
