कल्याण – कल्याण पश्चिमेतील राम मंदिराजवळील अन्सारी चौकातील एका गाळ्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखुजन्य पदार्थांचा साठा करून तो विक्रीसाठी जवळ बाळगला म्हणून पोलीस उपायुक्तांच्या विशेष पथकाने टिळक चौकातील एका पान टपरी चालकाला अटक केली आहे.

प्रतिक हर्षदभाई पटेल (३९) असे गुन्हा दाखल होऊन अटक झालेल्या पान टपरी चालकाचे नाव आहे. महाराष्ट्र राज्याच्या अन्न व सुरक्षा आयुक्तांच्या आदेशावरून राज्यात जुलै २०२४ पासून पुढील एक वर्षासाठी महाराष्ट्रात गुटखा, पानमसाला हे आरोग्याला घातक ठरणारे पदार्थ उत्पादित, साठवणूक आणि विक्री करण्यास प्रतिबंध आहे. यासंदर्भातच्या अधिसूचना शासनाने यापूर्वीच जाहीर केल्या आहेत. याविषयीची जनजागृती केली आहे.

गुटखा सदृश्य तंबाखू, सुगंधित पानमसाला विक्री करण्यास राज्यात बंदी आहे हे माहिती असुनही कल्याण पश्चिमेतील टिळक चौकातील वरदराज इमारतीत राहणाऱ्या प्रतिक हमीदभाई पटेल यांनी प्रतिबंधित सुगंधित केशरयुक्त विमल पानमसाला, सुपारी, मस्तानी सुगंधी तंबाखु अशी एकूण ३५ हजार रूपये किमतीची प्रतिबंधित वस्तुंची ४३ पाकिटे गाळ्यात साठा करून विक्रीसाठी ठेवली. तसेच, निको दिग्रा या इसमाच्या मदतीने प्रतिबंधित पानमसाला नावाचा गुटखा जर्दा ताब्यात बाळगून साठा करून तो विक्रीसाठी ठेवला होता.

टिळक चौकातील पटेल पानटपरी चालक प्रतिबंधिक गुटखा, सुगंधित पानमसाल्याचा साठा करून तो विक्री करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्तांच्या विशेष पथकाला समजली होती. पथकाने गुरूवारी पटेल यांच्या गाळ्यावर छापा मारून प्रतिबंधित साठा जप्त केला. हवालदार राहुल शिंदे यांच्या तक्रारीवरून प्रतिक पटेल यांच्या विरुध्द प्रतिबंधित पदार्थ विक्री केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक तुळशीराम राठोड तपास करत आहेत.