उल्हासनगर महापालिकेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी भाजपने जवळ केलेल्या कलानींना विधानसभेला दूर सारत कलानी कुटुंबाला धक्का दिला होता. गुरुवारी जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातही उल्हासनगरात कलानींच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. अगदी अटीतटीच्या झालेल्या या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदार ज्योती कलानी यांचा भाजपच्या कुमार आयलानी यांनी २००४ मतांनी पराभव केला आहे.

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात भाजपचे कुमार आयलानी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती कलानी असा थेट सामना होता. भाजपच्या महापौरांसह नगरसेवकांची ताकद आपल्याकडे ओढत ओमी कलानी याने आपल्या आई ज्योती कलानी यांच्यासाठी आक्रमक प्रचार केला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या लाटेतही या जागेवर कुमार आयलानी यांचा पराभव स्वीकारावा लागल्याने यंदा भाजपने येथे जोरदार प्रचार केला होता. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह मोठमोठे भाजप नेते प्रचारासाठी आले होते. दुसरीकडे कुमार आयलानी यांची वादग्रस्त विधाने, भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर दाखल असलेले गुन्हे, पप्पू कलानी यांचे शहरासाठी योगदान अशा प्रकारचा प्रचार करण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने भर दिला होता. त्यामुळे उल्हासनगरात अटीतटीची लढाई सुरू होती. निकालाच्या दिवशी सुरुवातीपासूनच कुमार आयलानी यांच्याकडे मताधिक्य होते. अखेर कुमार आयलानी यांचा अवघ्या २००४ मतांनी निसटता विजय झाला आहे. कुमार आयलानी यांना ४३ हजार ६६६ मते मिळाली. ज्योती कलानी यांना ४१ हजार ६६२ मते मिळाली. गेल्या विधानसभेत ज्योती कलानी यांचा अवघ्या १८६३ मतांनी विजय झाला होता. त्यामुळे यंदाही कमी फरकाच्या विजयाची परंपरा कायम आहे. या निकालामुळे कलानींच्या राजकीय वर्चस्वाला जोरदार धक्का बसला आहे.