Mumbai Kabutarkhana Controversy: ठाणे : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेकडून सर्व कबुतरखाने बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. या कारवाईनंतर जैन समाजाकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला आणि यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक बैठकही झाली. दादरचा कबुतरखाना बंद करण्यासाठी मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईवरून जैन समाज प्रंचड आक्रमक झाला होता. एकूणच कबुतरखाना बंद करू नये या मागणीसाठी जैन समाज आग्रही असून त्यावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या प्रकरणावर दिग्दर्शक आणि निर्माते विजू माने ( Viju Mane ) यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे.
कबुतरांच्या पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतुमुळे ‘हायपर सेंसिटिव्ह न्युमोनिया’चा (एचपी) आजार होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने तीन वर्षांपूर्वी कबुतरांना उघड्यावर खाद्यपदार्थ टाकू नका असे आवाहन करणारे फलक शहरात लावले होते. तसेच खाद्यपदार्थ टाकताना आढळल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचेही जाहीर केले होते.
ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले हरिनिवास सर्कल, जांभळी नाका, वागळे इस्टेट, उपवन येथील पायलादेवी मंदिर परिसर, बाळकुम, कळवा, खेवरा सर्कल अशा भागांमध्ये कबुतरखाने होते. त्यापैकी हरिनिवास, जांभळी नाका, खेवरा सर्कल यासह काही कबुतरखाना पालिकेने यापूर्वीच बंद केले आहेत. असे असले तरी काही गृहसंकुलामध्येही छोटे कबुतरखाने सुरू झाले आहेत. असे असतानाच, मुंबई उच्च न्यायलयाच्या आदेशामुळे ठाणेच नव्हे तर सर्वच शहरातील कबुतरखान्यांचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मुंबईत जैन समाज झाला होता आक्रमक
मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मुंबई महापालिकेकडून त्यासंदर्भात कारवाई करण्यात आली. यात दादर येथील कबुतरखाना ताडपत्री लावून तो बंद करण्यात आला. मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्यानंतर त्यावर जैन समाजाकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला. कबुतरांना खायला देणे हे जैन समाजासाठी ‘जीवदया’ (सर्व जीवांवर दया) चे प्रतीक मानले जाते. त्यामुळे त्यांनी कबुतरखाने बंद करण्यास विरोध केला आहे. दादरचा कबुतरखाना बंद करण्यासाठी मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईवरून जैन समाज प्रंचड आक्रमक झाला होता.
विरोधानंतर मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश
कबुतरांच्या पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतुमुळे ‘हायपर सेंसिटिव्ह न्युमोनिया’चा (एचपी) आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांकडून कबुतरखाने बंद करण्याच्या कारवाईचे स्वागत करण्यात येत होते. परंतु कबुतरखाना बंद करण्याच्या निर्णयास जैन समाजासह मुंबईचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा ( Mangal Prabhat Lodha ) यांनीही विरोध केला. त्यानंतर कबुतरखाना परिसरात कबुतरांच्या खाद्यपुरवठ्यावर निर्बंध आल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत महापालिकेने खाद्य पुरवठा नियंत्रित पद्धतीने सुरू ठेवावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी दिले आहेत.
माणसं मेली तर मरू देत
कबुतरखाना बंद करू नये या मागणीसाठी जैन समाज आग्रही असून त्यावरून आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या प्रकरणावर दिग्दर्शक आणि निर्माते विजू माने यांनी आता सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे. ” कबूतरांना धान्य घालून त्यांच्या नैसर्गिक वागण्याची वासलात लावलीच आहे. आता धार्मिक विषय बनवून ध्रुवीकरणाची संधी शोधा आणि मानवी मेंदू आणखी सडवून टाका. भलं व्हावं या देशाचं…आरोग्य गेलं खड्यात तुम्ही कबुतरं जपा, माणसं मेली तर मरू देत मारु भूतदयेच्या थापा “, असा संताप विजू माने यांनी व्यक्त केला आहे.