डोंबिवली – डोंबिवली विधानसभेचे भाजप आमदार तथा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून पाठिंबा किंवा सहकार्य मिळत नसल्याचे आरोप करत गेल्या दहा दिवसापूर्वी डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचापाडा प्रभागाचे भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी सपत्नीक भाजप पदाधिकारी आणि सदस्यत्व पदाचा राजीनामा कल्याण जिल्हा भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्याकडे दिला होता. दरम्यान, म्हात्रे समर्थक प्रकाश गोटे उर्फ पच्या यांनी जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्याबरोबर यशस्वी मध्यस्थी केली. या मध्यस्थीमधून सोमवारी रात्री मुंबईत जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या पुढाकाराने विकास म्हात्रे यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीनंतर समाधान झाल्याने म्हात्रे यांनी भाजपमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.

राष्ट्रवादीमधून थेट भाजपमध्ये आल्यावर भाजपने विकास म्हात्रे यांना घरात दोन नगरसेवक पदे, भाजपमधील ज्येष्ठांना डावलून कल्याण डोंबिवली पालिका मानाचे स्थायी समितीचे सभापती पद, गटनेते पद दिले होते. आमदार रवींद्र चव्हाण यांच्या आमदार निधीतील कोट्यवधी रूपयांचा निधी प्रभागातील सीमेंट काँक्रीट रस्ते आणि चौपाटी विकास कामांसाठी विकास म्हात्रे यांनी मिळवला होता. भाजपने एवढा मान दिला असताना प्रदेशाध्यक्षांवर थेट आरोप करत विकास म्हात्रे यांनी राजीनामा दिल्याने भाजप कार्यकर्ते संतप्त झाले होते.

म्हात्रे यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने जोरदार व्यूहरचना आखली होती. विकास म्हात्रे यांनी राजीनामा देताच पहिल्या पंधरा मिनिटात त्यांचा शासकीय पोलीस बंदोस्त काढण्यात आला. भाजपने त्यांना पहिला सूचक इशारा दिला. आमदार राजेश मोरे यांनी विकास म्हात्रे यांची भेट घेऊन त्यांना पक्ष प्रवेशाची गळ घातली. शिंदे शिवसेनेत प्रवेश केला तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नाराज होतील. त्यामुळे शिंदे शिवसेनेने विकास यांची प्रवेशाची दारे बंद केली. विकास म्हात्रे यांची पोलीस ठाण्यातील पार्श्वभूमी पाहता पोलिसांनी काही हालचाली सुरू केल्या होत्या, असे समजते.

राज्याचे गृहमंत्री पद भाजपकडे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असे असताना विकास म्हात्रे यांनी भाजप सोडण्याची तयारी केल्याने त्यांची कोंडी येत्या काळात होण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. विकास म्हात्रे समर्थकांच्या जुनी डोंबिवलीतील काही बेकायदा इमारती रडारवर आल्या होत्या. म्हात्रे समर्थक प्रकाश गोटे उर्फ पच्या यांनी जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्याबरोबर यशस्वी मध्यस्थी केली. या मध्यस्थीमधून सोमवारी रात्री मुंबईत जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या पुढाकाराने विकास म्हात्रे यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. विकास म्हात्रे यांच्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले. त्यांचे गैरसमज दूर करण्यात आले. या भेटीनंतर समाधान झाल्याने म्हात्रे यांनी भाजपमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यावेळी विकास म्हात्रे यांनी भेट घेतली.

विकास म्हात्रे यांनी मागील दोन ते तीन वर्षात भाजपचा दिलेला हा तिसरा राजीनामा होता. गेल्या वर्षापासून त्यांनी आपल्या कार्यालयातील भाजपचे कमळ, झेंडा काढून टाकला होता, असे कार्यकर्ते सांगतात. विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांची कार्यपध्दती संशयास्पद होती, अशा तक्रारी भाजप कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याकडे केल्या होत्या.

विकास म्हात्रे यांचा पक्षाच्या जेष्ठांच्या भेटीतून गैरसमज दूर करण्यात आला आहे. ते आता भाजपमध्ये निष्ठेने काम करतील.-नंदू परब, जिल्हाध्यक्ष, कल्याण जिल्हा