भरती रेषा क्षेत्रात भराव टाकण्यात आल्याचा आरोप

ठाणे : ठाणे खाडीकिनारी सुशोभीकरण प्रकल्प पुन्हा एकदा वादात सापडला आहे. सागरी हद्द नियंत्रण नियमनाचे (सीआरझेड) उल्लंघन करत साकेत आणि भाईंदर पाडा येथील खाडीकिनारी असलेल्या भरती रेषा क्षेत्रात भराव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.  ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत खाडीकिनारी सुशोभीकरण प्रकल्पाची कामे सध्या खाडीकिनारी सुरू आहेत. मात्र, या प्रकल्पाच्या परवानगी प्रक्रियेपासूनच हा प्रकल्प वादात सापडलेला आहे. आता या प्रकल्पासंदर्भात आणखी एक गंभीर मुद्दा समोर आलेला आहे. घोडबंदर येथील भाईंदर पाडा तसेच साकेत भागात सुरू असलेल्या प्रकल्पाच्या कामादरम्यान भरती रेषामध्ये भराव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप स्थायी समितीच्या बैठकीत भाजप नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी केला आहे. महापालिकेने तात्काळ भरती रेषेतील भराव काढून टाकावा आणि ज्यांच्याकडून या चुका झाल्या आहेत त्यांच्याकडून ही रक्कम वसुल करण्यात यावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. मात्र, ठाणे महापालिकेने हे आरोप फेटाळून लावले. या ठिकाणी कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले नसून या ठिकाणी खारफुटी किंवा भरती रेषा क्षेत्रात कोणताही भराव टाकण्यात आलेला नाही, असा दावा महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे. अखेर या दोन्ही प्रकल्पांची भरतीच्या वेळेत पाहणी केली जाईल आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी दिले.