गणेश घाट, भोपर, उंबार्ली टेकडी आणि कोळेगाव येथे वास्तव्य
निखिल अहिरे
ठाणे : युरोप खंडात वास्तव्यास असणारे विविध प्रजातींचे पक्षी सध्या स्थलांतर करून डोंबिवलीत दाखल झाले आहेत. यामध्ये दुर्मीळ पक्ष्यांचाही समावेश आहे. मागील काही दिवसांपासून डोंबिवली येथील काही ठिकाणी परदेशी पक्षी आढळून येत आहेत. या स्थलांतरित पक्ष्यांचे छायाचित्र टिपण्यासाठी अनेक पक्षिप्रेमी आणि छायाचित्रकार या ठिकाणांना भेट देत आहेत. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात दाखल होणारे हे सर्व पक्षी मार्चच्या सुरुवातीला परतीच्या प्रवासाला निघत असल्याची माहिती युवा पक्षी निरीक्षक अर्णव पटवर्धन याने दिली.
येऊरचे जंगल, डोंबिवली येथील उंबार्ली टेकडी, मलंगगड परिसर, ठाणे आणि वाशी येथील विस्तृत खाडी परिसर येथे विविध वनस्पती, दुर्मीळ पक्षी आणि प्राणी यांचा वावर असतो. पर्यावरण अभ्यासकांच्या मते डोंबिवली येथील उंबार्ली टेकडी परिसरात सुमारे १३४ प्रजातींचे विविध पक्षी आढळून येतात. यामध्ये स्थानिक पक्ष्यांचा समावेश अधिक आहे. अर्णव याने काही स्थलांतरित पक्ष्यांचे छायाचित्रही टिपले आहे. जिल्ह्यात सर्वप्रथम स्थलांतर करून येणारा पक्षी हा तुतवार आहे. सध्या डोंबिवली आणि आसपासच्या परिसरांत परदेशातले २२ प्रजातींचे परदेशी पक्षी आढळून येत आहेत. मागील काही वर्षांपासून डोंबिवली आणि आसपासच्या परिसरांत स्थलांतरित पक्ष्यांचे प्रमाण वाढले आहे. यापैकी काही पक्ष्यांना ठाणे आणि वाशी खाडी येथील वातावरण अनुकूल असल्याने ते स्थायिक होत असल्याची माहिती वन्य छायाचित्रकार आणि पक्षी अभ्यासक ओंकार देशपांडे यांनी दिली.
परदेशी पाहुण्यांची वसतिस्थाने
सध्या डोंबिवली येथील गणेश घाट, भोपर, उंबार्ली टेकडी, सातपूल, मलंगगड परिसर, गांधारी नदी परिसर, काचोरे, कोळेगाव या परिसरांत हे परदेशातील पक्षी दिसून येत आहेत.
रणगोजा ठरतोय आकर्षण
मागील दोन वर्षांपासून डोंबिवली आणि आसपासच्या परिसरांत रणगोजा आढळून आला नव्हता. यंदा मात्र हा पक्षी परदेशातून स्थलांतर करून डोंबिवलीमधील भोपर या भागात आढळून आला आहे. प्रामुख्याने गवताळ प्रदेशात आढळून येणारा हा पक्षी जिल्ह्यातील पक्षिप्रेमींसाठी आकर्षण ठरत आहे.
सध्या आढळणारे स्थलांतरित पक्षी
- दलदलीच्या भागात आढळणारे
तुतवार, छोटा पाणलावा, टिमिंकचा टीलवा, राखी बगळा, रंगीत पाणलावा, काळय़ा शेपटीचा टिलवा, चमचा, तलवार बदक, थापटय़ा, भुवई बदक, चक्रांग, नदी सुरय, कल्लेदार सुरय, रक्तसुरमा, तपकिरी डोक्याचा कुरव
- गवताळ प्रदेशात आढळणारे निळकंठ, रणगोजा
- जंगलात आढळणारे अमूर ससाणा, मोठा ठिपक्यांचा गरुड, दलदल ससाणा, निळय़ा शेपटीचा वेडाराघू, पळस मैना