अंबरनाथः अंबरनाथ काटई राज्यमार्गावर अंबरनाथ औद्योगिक वसाहतीजवळ अप्रतिम हॉटेल शेजारचा पूल अनेक वर्षांपासून रखडला आहे. वालधुनी नदीवर तीव्र उतार आणि चढाव असल्याने काटईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर अनेक अवजड वाहने बंद पडतात. त्यामुळे येथे नव्या पुलाच्या उभारणीला २०२३ मध्ये मंजुरी मिळाली होती. मात्र दोन वर्षांनंतरही रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाल्यानंतरही या मार्गावरचा हा पूल तयार होऊ शकलेला नाही. परिणामी येथे कोंडी होत असून दोनच दिवसांपूर्वी येथे ट्रेलर बंद पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. आता या पुलाचे काम पावसाळ्यानंतर सुरू करण्याचे नियोजन असल्याने एमआयडीसी प्रशासनाकडून सांगितले जाते आहे.

अंबरनाथ शहरातून जाणारा अंबरनाथ काटई राज्यमार्ग वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या मार्गावर अंबरनाथजवळ वालधुनी नदीवर औद्योगिक वसाहतीच्या पुढे एक पूल आहे. सुमारे ४० वर्षे जुना हा पूल अंबरनाथहून काटईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर तीव्र उताराचा आहे. तर अंबरनाथकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हा पूल रस्त्याच्या समांतरच आहे. मात्र काटईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर तीव्र उतार आणि काही क्षणात तीव्र चढ असल्याने येथे अनेक अवजड वाहनांना वाहने हाकताना त्रास होतो. अनेकदा अवजड वाहने येथून संथगतीने चालतात. अनेकदा त्यांचा वाहनावरील नियंत्रण सुटते की काय या भीतीने मागून येणारी वाहने थांबून घेतात. त्यामुळे अनेकदा अपघाताची भीतीही असते.

याच ठिकाणी सोमवारी एक अवजड वाहन बंद पडले होते. त्यानंतर सुमारे पाच तास वाहतूक संथगतीने सुरू होती. त्यामुळे वाहनांचा खोळंबा होत होता. त्याचा फटका वाहनचालकांना बसला. यापूर्वीही अनेकदा येथे वाहने बंद पडली आहेत. एका अवजड वाहनाचे नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात झाला होता. त्यामुळे येथील तीव्र उतार कमी करून शेजारच्या पुलाला समांतर असा नवा पूल बांधण्याची मागणी होत होती. काटई अंबरनाथ राज्यमार्गाच्या काँक्रीटीकरणाच्या कामात या पुलासाठी १० कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला होता. मात्र आजतागायक या पुलाचे काम सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे. हा पूल कधी होणार असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काम पावसाळ्यानंतरच

रस्त्याचे काम बऱ्याच ठिकाणी पूर्ण झालेले असताना हा पूल मार्गी लागत नसल्याबाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, पावसाळ्यानंतर या पुलाचे काम सुरू होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. काही तांत्रिक बाबी आणि परवानग्यांमुळे पुलाच्या कामाला विलंब झाला होता. त्यामुळे आता या पुलाच्या प्रक्रिया पूर्ण झाल्या असून पावसाळा सुरू असल्याने काम सुरू झाली नसल्याची बाब अधिकाऱ्यांनी सांगितली आहे. काम सुरू झाल्यानंतर सहा महिन्यात हे काम पूर्ण करण्याचा एमआयडीसीचा मानस आहे. त्यामुळे नव्या पुलासाठी २०२६ वर्ष उजाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.