कल्याण : केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बुधवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रस्त्यावरील कर्णिक छेद रस्त्यावरील यशवंतराव चव्हाण मैदान (मॅक्सी मैदान) येथे दुपारी युध्दसरावाचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. या युध्दपूर्व सरावाच्यावेळी एकाचवेळी कल्याण आणि परिसरात हवाई, बाॅम्ब हल्ल्याची पूर्वसूचना देणारे चार मोठ्या आवाजाचे भोंगे एकाचवेळी वाजविण्यात येणार आहेत. या कालावधीत कोणीही नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन कल्याण परिमंडलाचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.

युध्दसरावाचा भाग म्हणून ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये बुधवारी दुपारी सराव प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. हवाई किंवा बाॅम्ब हल्ल्याची पूर्वसूचना देणारे भोंगे यावेळी एकाचवेळी वाजविण्यात येतील आणि नागरिकांना सावध केले जाईल. भोंगे वाजल्यानंतर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी सूचना केल्या जातील. आपत्ती व्यवस्थापन विभागातील युध्दसराव पथकातील कर्मचारी, जवान नागरिकांना गडबड, धावपळ न करता नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहचविण्यासाठी साहाय्य करतील.

बाॅम्ब हल्ला झाल्यानंंतर त्या परिसरात शोध मोहीम घेऊन इमारत किंवा अडचणीच्या ठिकाणी अडकलेल्या जखमी नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढणे, त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना अधिकच्या उपचारासाठी रुग्णालयात नेण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल, असे उपायुक्त झेंडे यांनी सांगितले.या युध्दसरावाच्यावेळी शासनाकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर दुपारी चार वाजता नागरी संंरक्षण दलाचे चार भोंगे (सायरन) वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा दिला जाईल. भोंगे वाजण्यास सुरुवात होताच, नागरिकांनी घाबरून जाऊ नये. हा युध्दाच्या पूर्वीच्या सरावाचा भाग (ऑपरेशन अभ्यास) आहे. या सरावाच्यावेळी कोणतीतरी आपत्ती उदभवली आहे, असे नागरिकांनी मानू नये, असे उपायुक्त झेंडे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक डाॅ. डी. स्वामी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. संदीप माने, नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक विजय जाधव, जिल्हा आपत्ती व्यस्थापन विभागाच्या डाॅ. अनिता जवंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा युध्दपूर्व सराव प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे.