सामाजिक जाणीव, व्यसनमुक्ती, चारित्र्यसंपन्नता, वृक्षसंवर्धन आणि राष्ट्रीय अस्मिता, एकात्मता यांची जाणीव विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून व्हावी. एक आदर्श तरुण शाळेच्या माध्यमातून घडावा, या उद्देशातून ‘वसुधैव कुटुम्बकम’ अध्यात्मपीठातर्फे आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण तालुक्यातील मलंग गडाच्या पायथ्याशी वारकरी शाळा चालवली जाते. या शाळेत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी गुरुकुल पध्दतीने शिक्षण घेत आहेत. नियमीत शालेय अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांना अध्यात्म, वारकरी शिक्षणाचे धडे दिले जात आहेत.
मलंग गडाच्या पायथ्याशी ब्राह्मण करवले गावाजवळ डोंगराच्या कुशीत पाच गुंठे जमिनीवर वारकरी शाळा आहे. (ठाणे, रायगड जिल्’ााच्या हद्दीवर) आचार्य प्रल्हाद शास्त्री यांचा आश्रम म्हणून ही वास्तू ओळखली जाते. आश्रमाच्या आवारात गोशाळा आहे. १५ देशी गायींचे येथे संगोपन व संवर्धन केले जाते. आश्रमासमोर प्रशस्त मैदान, चोहोबाजुने वनराई अशा निसर्गरम्य वातावरणात ही वास्तू आहे. या वास्तूजवळून मलंगगड, पनवेलकडे (नितळस) जाण्यासाठी रस्ते आहेत. या रस्त्यावरुन ये-जा करणारे पांथस्थ, संत, साधू, आगंतूक आश्रमात आल्यानंतर त्यांना वेळेप्रमाणे नाष्टा, भोजन दिले जाते. अखंड अन्नछत्र आश्रमात सुरु असते.
वारकरी शिक्षण
संध्याकाळी शाळेतील शेवटचा वर्ग सुटला की त्यानंतर दिवाबत्तीच्यावेळी विद्यार्थ्यांना हरिपाठ, भजन, अभंग, कीर्तन शिकवले जाते. विद्यार्थ्यांना आवडीप्रमाणे तबला, पेटी, टाळ, मृदुंग, चिपळी, वीणा, चकवा वादनाचे धडे दिले जातात. हा नित्योपक्रम आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांला दर आठवडय़ाला आवडीचा विषय घेऊन कीर्तन, प्रवचन सादर करावे लागते. सततच्या सरावामुळे चुणचुणीत विद्यार्थी हरिपाठ, कीर्तन प्रवचनात अव्वल आहेत. आश्रमातील विद्यार्थ्यांच्या लयबध्द हरिपाठाला राज्यभरातून
मागणी आहे.
गुरुकुल शिक्षण
गुरुकूल पध्दतीचे हे शिक्षण असल्याने विद्यार्थी आश्रमात निवास करुन असतात. वारकरी शाळेत प्रवेश घेतल्यानंतर शाळेची सर्व शिस्त विद्यार्थ्यांना पाळावी लागते. पांढरे सोहळे, उपरणे आणि डोक्यावर शिखा (शेंडी) असा शाळेचा गणवेश असतो. पहाटे ४ वाजता शाळेचा दिनक्रम सुरु असतो. स्नानसंध्येनंतर विद्यार्थी योग, प्रार्थना, काकड आरती करतात. त्यानंतर आश्रमात शाळा भरते. काही बा’ा शिक्षक, आश्रमाने मानधनावर नेमलेले शिक्षक विद्यार्थ्यांचा नियमित शाळेच्या वेळेप्रमाणे अभ्यास घेतात. संस्कृत संभाषणावर येथे सर्वाधिक भर दिला जातो. विद्यार्थ्यांची बोली भाषा संस्कृत व्हावी, हा यामागील उद्देश आहे. शाळा सुटल्यानंतर अभ्यास, आश्रमाच्या आवारातील स्वच्छता, वृक्षारोपण, गाई-वासरांच्या संगोपनामध्ये विद्यार्थी रममाण होतात.
पात्रता परीक्षेने प्रवेश
या सेवाभावी कार्याबरोबरच राष्ट्र घडणीत हातभार लावणारी, समाजाचा उत्कर्ष करणारी पिढी आश्रमाच्या माध्यमातून तयार व्हावी, म्हणून गेल्या चार वर्षांपासून आचार्य प्रल्हाद शास्त्री यांनी सुरुवातीला जागेच्या अभावी कुंभार्ली गावात मोजके विद्यार्थी घेऊन शाळा सुरूकेली. विद्यार्थी संख्या वाढू लागली. जागेची अडचण आल्यानंतर गावाबाहेरील आश्रमात ही वारकरी शाळा सुरु करण्यात आली. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. वारकरी शाळेत नियमीत शालेय अभ्यासक्रमाबरोबर वारकरी शिक्षण पूर्ण करता येत असल्याने, राज्याच्या विविध भागातील पालक आपल्या मुलांना वारकरी शाळेत प्रवेश मिळावा म्हणून धडपडत असतात. शाळेतील जागेची उपलब्धता, त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी लागणारी यंत्रणा पाहून ४५ विद्यार्थी दरवर्षी शाळा प्रवेशासाठी निवडले जातात. इयत्ता ५ वी ते १० पर्यंतचे हे विद्यार्थी असतात. या विद्यार्थ्यांना वारकरी शाळेत प्रवेश देण्यापूर्वी मे मध्ये योग, संस्कृत संभाषण शिबीर घेतले जाते. या शिबीरात ७० ते ८० विद्यार्थी सहभाही होतात. या विद्यार्थ्यांची शिबीर समाप्तीच्यावेळी एक परीक्षा घेतली जाते. जे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होतात, त्यांना वारकरी शाळेतील इयत्ता ५ वी ते १० पर्यंतच्या वर्गात प्रवेश दिला जातो, असे आचार्य प्रल्हाद शास्त्री यांनी सांगितले.