वर्षभरात ठाणे जिल्ह्यातील १ लाखाहून अधिक घरात नव्या नळजोडण्या

पूर्वा साडविलकर

ठाणे:  ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘जल जीवन मिशन’या योजने अंतर्गत मागील वर्षी म्हणजेच ३१ मार्च २०२१ अखेपर्यंत १ लाख ३१ हजार ६१२ घरात नळजोडणी देण्यात आल्या आहेत. आगामी वर्षांत आणखी १ लाख २ हजार ९८३ घरांमध्ये नव्या नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले आहे. यापैकी २०२१-२२ मध्ये ६९ हजार ८५२ घरात नळ देण्याचे उद्दिष्ट असून आतापर्यंत ४ हजार ९६५ घरात नळजोडणी देण्यात आली आहे. हे उद्दिष्ट ३१ मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचा दावा जिल्हा परिषदेने केला आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे. तसेच गावातील महिलांचा पाणी आणण्याचा त्रास कमी व्हावा यासाठी गावातील प्रत्येक घरात नळ जोडणी उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारमार्फत ‘जल जीवन मिशन’ ही योजना राबविण्यात येत असून २०२४ अखेपर्यंत ग्रामीण भागातील सर्व घरात नळ जोडणी करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर ही योजना राबविण्यात येत आहे.

ठाणे ग्रामीण भागातील गाव-पाडय़ांमधील महिलांना तसेच पुरुषांना पाण्यासाठी पायपीट करत विहीर तसेच कुपनलिकेवर जाऊन पाणी आणावे लागत होते. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जल जीवन मिशन’ योजना वेगाने राबविण्यात येत असून काही प्रमाणात ग्रामीण भागातील नागरिकांचा त्रास कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. या योजनेअंतर्गत ठाणे ग्रामीण भागातील २ लाख ३४ हजार ५९५ कुटुंबांपैकी मागील वर्षी म्हणजेच ३१ मार्च २०२१ अखेपर्यंत १ लाख ३१ हजार ६१२ कुटुंबांच्या घरात नळजोडणी करण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राधेश्याम आडे यांनी दिली.

ठाणे ग्रामीण भागात आता केवळ १ लाख २ हजार ९८३ कुटुंबांच्या घरात नळजोडणी करण्याचे उद्दिष्ट शिल्लक राहिले असून त्यापैकी यावर्षी ६९ हजार ८५२ कुटुंबांच्या घरात नळजोडणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या उद्दिष्टापैकी आतापर्यंत ४ हजार ९६५ कुटुंबांना नळजोडण्या देण्यात आल्या आहेत.

४७० कामे हाती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जल जीवन मिशन’ अंतर्गत अगोदर देण्यात आलेल्या नळजोडण्यांची दुरुतीची कामे हाती घेण्यात येतात. यंदाच्या वर्षी नळजोडणी दुरुस्ती करणे, काही ठिकाणी जलवाहिनी वाढविण्याचे काम, नव्याने पाण्याची टाकी बांधणे, ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे. परंतु त्या कुटुंबापर्यंत नळजोडणी दिलेली नसेल अशी ४७० कामे हाती घेण्यात आली आहेत.