कल्याण – कल्याण शिळफाटा रस्त्यावर काटई -बदलापूर रस्त्यावरील कोळे गाव हद्दीत समाधान हॉटेल भागात शुक्रवारी रात्री बारा वाजता एमआयडीसीची उच्च दाबाची जलवाहिनी फुटली. जलवाहिनीतून उच्च दाबाने शेकटो लीटर पाणी बाहेर फेकले गेल्याने हे पाणी जलवाहिनी परिसरातील कोळे गावांमधील घरांमध्ये घुसले.

बारवी धरणाकडून जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रातून आलेल्या नवी मुंबई, ठाणे, मुंब्रा, कळवा, डोंबिवली परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या काटई बदलापूर मार्गाने काटई कोळे गाव हद्दीतून शिळफाटा चौकमार्गे नवी मुंबई, मुंब्रा दिशेने टाकण्यात आल्या आहेत. या जलवाहिनीवरील कोळे गाव हद्दीतील समाधान हाॅटेल भागातील जलवाहिनीच्या एका वाहिकेला पाण्याच्या अति उच्च दाब प्रवाहामुळे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास गळती लागली. या गळतीचे प्रमाण वाढूुन जलवाहिनी वाहिका अति दाबामुळे फुटली. जलवाहिनीतील वेगवान प्रवाहाने वाहणारे पाणी मध्यरात्रीच्या सुमारास परिसरातील घरांमध्ये घुसले. या भागातील रस्ते जलमय झाले.

मुसळधार पावसामुळे महापूर येऊन घरात पाणी घुसले की काय या भीतीने घरात जमिनीवर झोपलेले रहिवासी जागे झाले. दरवाजा उघडल्यानंतर त्यांना घर परिसरातील रस्ते, बोळ जलमय झाल्याचे दिसले. मुसळधार पाऊस नसताना अचानक इतके पाणी आले कोठुन असे प्रश्न कोळेगावातील रहिवाशांना पडले. कोळेगावातील बहुतांशी रहिवासी घरात पाणी घुसल्याने जागे झाले. त्यांनी विजेऱ्या घेऊन परिसरात पाहणी केली. त्यांना एमआयडीसीची काटई बदलापूर रस्त्यावरील कोळेगाव जवळील समाधान हॉटेलजवळील जलवाहिनी फुटली असल्याचे निदर्शनास आले.

ग्रामस्थांनी ही माहिती तात्काळ एमआयडीसीच्या वरिष्ठांना दिली. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या जलवाहिनीतून जांभूळ उदंचन केंद्र (बारवी धरण) भागातून येणारा पाणी पुरवठा बंद केला. एमआयडीसीची जलवाहिनी दुरूस्त करणारे तांत्रिक पथक आणि एमआयडीसीचे स्थानिक अधिकारी मध्यरात्री घटनास्थळी दाखल झाले. फुटलेल्या जलवाहिनीतील पाण्याची पातळी कमी होताच, त्यांनी नादुरुस्त जलवाहिनीचा भाग काढून टाकला. त्या ठिकाणी नवीन भाग जोडून पहाटेपर्यंत या जलवाहिनीवरील पाणी पुरवठा पूर्ववत केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जलवाहिनी फुटून घरातील सामानाचे नुकसान झाल्याने ग्रामस्थांनी भरपाई देण्याची मागणी एमआयडीसी आणि महसूल विभागाकडे केली आहे. महसूल विभागाचे ग्राम विकास अधिकारी सकाळीच वरिष्ठांच्या आदेशावरून कोळे गाव हद्दीत दाखल झाले. त्यांनी जलवाहिनी फुटून घरात पाणी घुसलेल्या आणि घरातील सामानाचे नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे केले. गावात पंचनामे करण्यासाठी दाखल झालेले ग्राम विकास अधिकारी हे बाहेरच्या सजेतील असल्याने त्यांनी घरात पाणी घुसून नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे न करता सुस्थितीमधील घरांचे पंचनामे केल्याच्या तक्रारी काही रहिवाशांनी केल्या. महसूल विभागाच्या वरिष्ठांनी याप्रकरणात लक्ष घालून ज्या घरांचे जलवाहिनी फुटून नुकसान झाले आहे त्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी ग्रामस्थांनी मागणी आहे.