कल्याण – विहिरी, विंधन विहिरी, नैसर्गिक स्त्रोत आटू लागल्याने शहापूर तालुक्याच्या ग्रामीण, आदिवासी पाड्यांवर पाणी टंचाईला सुरूवात झाली आहे. गावापासून एक ते दोन किलोमीटर जाऊन महिलांना डोक्यावरून पाणी आणावे लागते. आता जून-जुलैपर्यंत ही पाणी टंचाईची परिस्थिती राहणार असल्याने महसूल, जिल्हा परिषद प्रशासनाने शहापूर तालुक्यासाठी तयार केलेल्या पाणी टंचाई कृती आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न करावेत, अशी जोरदार मागणी तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे.

शहापूर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र डोंगर उताराचे आहे. पावसाळ्यात पडलेले पावसाचे बहुतांशी पाणी नदी, डोंगर माथ्यावरून वाहून जाते. गाव हद्दीतील धरणांचे पाणी जलसिंचनासाठी वापरले जाते. यात भाजीपाल्याची लागवड अधिक प्रमाणात केली जाते. मे अखेरपर्यंत ही लागवड सुरू राहते. त्यामुळे पिण्यासाठी नदी, ओहळांमधून मुबलक पाणी उपलब्ध होत नाही, अशा तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई कायमची संपवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मागील वर्षी कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्याची स्थानिक पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. दरवर्षी तालुक्यातील पाणी पुरवठ्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च होत असताना पाणी टंचाई निर्माण होते कशी, असे प्रश्न जिल्हा प्रशासनाकडून उपस्थित करण्यात आल्याने स्थानिक तालुका प्रशासन अडचणीत आले आहे, असे एका तालुका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

हेही वाचा… मुख्यमंत्र्यांचा ठाणे जिल्ह्यात हिंदुत्वाचा नारा, हाजी मलंग की श्रीमलंगच्या वादाला पुन्हा फोडणी

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी खासगी विहिरी, विंधन विहिरी ताब्यात घेणे, विहीर, नदी, गावातील ओहाळातील गाळ काढून पाणी टंचाईचा प्रश्न स्थानिक पातळीवर तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.कसारा खोऱ्यातील शिरोळ घाटमाथ्यावर कुंडण धरण आहे. या धरणात एक हजार ५६२ घन मीटर पाणी साठा आहे. या धरणातून परिसरातील १०२ हेक्टर क्षेत्रात जलसिंचन होते. या धरणातून कसारा परिसरातील वाशाळा, फुगाळे, खर्डी, अजनूप, गायदरा गावांना पाणी पुरवठा केला जातो. या धरणाच्या अधिग्रहणाचा प्रश्न सध्या अनिर्णित आहे. या धरणाच्या अधिग्रहणाचा प्रश्न प्रलंबित राहिला तर कसारा परिसरातील गावांना भातसा नदीतून पाणी पुरवठा करावा लागणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा… बदलापूर स्थानकात लोकलचा थांबा बदलला; फलाट एक आणि दोनवर लोकल दीड डब्बा कर्जत दिशेने पुढे थांबणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील ५५ वर्षात भातसा नदीतील पाण्यातून तालुक्यातील टंचाई ग्रस्त गावांना पाणी पुरवठा केला जातो, असे तालुका पंचायत समितीमधील अधिकाऱ्याने सांगितले. टँकर व्यतिरिक्त इतर प्रभावी पाणी पुरवठा योजनांची अंमलबजावणी टंचाईग्रस्त गावात करण्याचे आदेश जिल्हा विभागाने तालुका प्रशासनाला दिले आहेत. तालुक्यातील टंचाईग्रस्त गाव, पाड्यांची प्रत्यक्ष पाहणी करून मागील पाच वर्षापासून या गावांना ऑक्टोबर ते जून कालावधीत कशा पध्दतीने पाणी पुरवठा केला जात होता. या सर्व परस्थितीची पाहणी करून स्थळ पाहणी अहवाल देण्यात यावा, असे आदेश उपविभागीय अधिकारी डॉ.जयश्री ठाकरे यांनी दिले आहेत.