Thane Water supply shutdown : ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात सोमवारपासून पावसाचा जोर वाढला असतानाच, ठाणे महापालिका क्षेत्रातील काही भागांचा पाणी पुरवठा शुक्रवार, १९ सप्टेंबर रोजी बंद राहणार आहे. कळवा, मुंब्रा, दिवा यांच्यासह वागळे आणि माजिवडा-मानपाडा प्रभाग समितींचा काही भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार असून पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन ६२१ दशलक्षलीटर इतक्या पाण्याची गरज आहे. परंतु शहराला प्रत्यक्षात दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. त्यात पाणी बंदमुळे शहरात पाणी टंचाई समस्येत भर पडत आहे.
शुक्रवारी पाणी नाही
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रातील जलाशय येथे बारवी गुरुत्व वाहिनी क्र. १. २ व ३ वर वाहिन्यांचे उन्नतीकरण आणि तातडीने देखभाल करण्यासाठी पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे, ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा, मुंब्रा, दिवा यांच्यासह वागळे आणि माजिवडा-मानपाडा प्रभाग समितींचा काही भाग येथे शुक्रवार, १९ सप्टेंबर रोजी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
या भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार
बारवी गुरुत्व वाहिनी क्र. १. २ व ३ वर वाहिन्यांचे उन्नतीकरण आणि तातडीने देखभाल करण्याकरीता गुरुवार, १८ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून शुक्रवार, १९ सप्टेंबर रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत एकूण २४ तास पाणी पुरवठा बंद राहील. त्यामुळे, ठाणे महानगरपालिके अंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१ चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये, तसेच, वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २. नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहील.
पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन वाहिन्यांचे उन्नतीकरण आणि देखभालीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होईल. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. या कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे. तसेच, पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन ठाणे महापालिकेने नागरीकांना केले आहे.