वाढत्या शहरीकरणामुळे पाणगवत, दलदलीची ठिकाणे नष्ट झाल्याचा परिणाम
वसई तालुक्यात पूर्वी पाणगवत, दलदल या ठिकाणी पाणकोंबडी, फटाकडी आदी पक्षी आढळायचे. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे पाणगवत, दलदलीची ठिकाणे नष्ट झाली असल्याने हे पाणपक्षीही वसईतून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत. या पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून त्यांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे.
पावसाळ्यात पाणथळ, दलदली या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर बेडूक, खेकडे, शिंपले, मासे, जालीय किडे, अळ्या, चतुर व कीटकांचे प्रमाण वाढते. बऱ्याचदा दलदलीच्या ठिकाणी पाणगवत वाढते. हे गवत माणसाच्या उंचीएवढे वाढलेले
दिसून येते. या पाणगवतात पुष्कळ जीव राहतात. जैवविविधतेमुळे तिथे मोठी परिसंस्था तयार होते.
अशा दलदलीच्या ठिकाणी पाणपक्षी मोठय़ा संख्येने वावरताना दिसतात.
वसई तालुक्यातील दलदलीच्या ठिकाणी जिथे पाणगवत वाढलेले आहे, अशा भागांत फटाकडी, पाणकोंबडी या पाणपक्ष्यांचा मुक्त वावर असतो. मात्र नागरीकरणामुळे पाणगवत आणि दलदलीची ठिकाणे नष्ट झाल्याने या पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

शहरीकरणाचा परिणाम
’ पाणगवतामुळे पाणकोंबडय़ा आणि फटाकडय़ांना नैसर्गिक लपणं मिळाल्याने नकळत शत्रूंपासून संरक्षण मिळते. त्यामुळे त्यांच्या वास्तव्यासाठी पाणगवत असणे गरजेचे आहे. परंतु दलदलीच्या ठिकाणी मातीभराव टाकून गृहसंकुले उभी राहिली. वाढत्या शहरीकरणामुळे वसई तालुक्यातील दलदलीच्या ठिकाणी असलेले पाणगवत नष्ट झाले आहे.
’ बऱ्याच ठिकाणी दलदलीमध्ये मलनि:सारण केले जाते. त्याचा परिणाम परिसंस्थेवर होतो.
’ गोशाळांसाठी पाणगवताची छाटणी केली जाते. कापण्यासाठी आलेले मजूर पाणकोंबडय़ा आणि फटाकडय़ांची शिकार करतात. गुरेचराईमुळे या पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त होत आहेत.
’ या सर्वाचा परिणाम पाणकोंबडी आणि फटाकडय़ांवर होत असल्याचे नेस्ट या संस्थेच्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

पाणगवत नष्ट झाल्यामुळे पाणकोंबडय़ा आणि फटाकडय़ा या पाणपक्ष्यांच्या संख्येत घट झाली आहे. पाणगवत नष्ट होणे हेच प्रमुख कारण आहे.
– सचिन मेन, पक्षी अभ्यासक