कल्याण – पावसाच्या जोरधारांमुळे वालधुनी नदी दुथडी भरून वाहत आहे. या नदी काठ पात्रात नागरिकांच्या झोपड्या आहेत. या झोपड्यांमध्ये मंगळवारी सकाळपासून पावसाचे पाणी घुसून परिसर दुपारपर्यंत जलमय झाला. मुसळधार पाऊस सुरू असल्याने पुराच्या पाण्याचा दरवर्षीचा अंदाज असल्याने नागरिकांनी अगोदरच अत्यावश्यक सामान पावसात भिजणार नाही अशी व्यवस्था केली आहे.

उल्हास नदी धोक्याच्या पातळीवरून वाहू लागली की ही नदी वालधुनी नदीचे जाणारे पाणी आत घेत नाही. उल्हास नदीने बाहेर फेकलेले वालधुनी नदीचे पाणी मग वालधुनी परिसरातील वस्तीत घुसण्यास सुरूवात होते. सकाळपासून वालधुनी परिसरातील घरे पुराच्या पाण्याने वेढली आहेत. घराघरात रहिवासी घरात घुसलेले पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पालिकेची आपत्कालीन पथके दहा प्रभाग साहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागांमध्ये पाण्याचा निचरा करण्यासाठी फिरत आहेत. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते पुराचे पाणी ओसरण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

वालधुनी भागात पूरमय परिस्थिती निर्माण झाल्याचे समजल्यावर माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी या भागात फिरून पाहणी केली. नागरिकांना भोजन पाकिटांचे वाटप केले. वालधुनी भागातील पाण्याचा निचरा लवकर होईल यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना पालिका अधिकाऱ्यांना केल्या.

कल्याण पूर्वेतील चिंचपाडा, खडेगोळवली, गावदेवी रस्ता, माणेरे परिसरातील सखल भागात पाणी साचले आहे. कल्याण पश्चिमेत ठाणकारपाडा, बेतुरकरपाडा, खडकपाडा, बारावे, मांडा, टिटवाळा परिसरातील सखल भागात पाणी तुंबले आहे. टिटवाळा परिसरातील बल्याणी, बनेली, वासुंदी रस्ता, उंभार्णी भागातील बेकायदा चाळी गेल्या आठ महिन्याच्या काळात साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी भुईसपाट केल्या. त्यामुळे या भागातील पावसाचे पाणी अडण्याचे मार्ग मोकळे झाले. टिटवाळ्यात बहुतांशी चाळी नैसर्गिक नाले, गटारे, ओहळ बंद करून बांधल्या आहेत. त्यामुळे यापूर्वी टिटवाळा शहर जलमय होत होते. मागील वर्षभरापासून साहाय्यक आयुक्त पाटील यांनी एकही नवीन बेकायदा बांधकाम टिटवाळ्यात होऊन दिले नाही. त्याचा दृश्य परिणाम म्हणजे मुसळधार पाऊस पडुनही टिटवाळ्यात नेहमीच जलमय होणारे भाग यावेळी पूरमुक्त राहिले.

२७ गाव हद्दीतील पोहच रस्ते जलमय झाले आहेत. भोपर, देसलेपाडा भाग जलमय झाला आहे. शिळफाटा रस्त्यावरील अनेक वाहने या अंतर्गत रस्त्यावरून संथगतीने धावत आहेत.

डोंबिवलीत झाड कोसळले

डोंबिवलीत चंद्रकांत पाटकर शाळा परिसरात मुसळधार पावसाच्या माऱ्याने गुलमोहराचे एक जुनाट जाड मंगळवारी कोसळले. अतिशय संथगतीने हे झाड रस्त्याच्या दिशेने कोसळले. त्यामुळे बाजुच्या इमारती, वाहनांची मोडतोड झाली नाही. या झाडाचे खोड रस्त्यापासून काही उंचीवर अधांतरी राहिल्याने वाहतुकीला अडथळा नव्हता. कोणत्याही प्रकारचा धोका नको म्हणून पाटकर शाळा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. पालिका अग्निशमन जवानांनी झाडाची छाटणी करून रस्त्यावरचा झाडाचा अडथळा दूर केला.

डोंबिवली पश्चिमेत देवीचापाडा, मोठागाव, माणकोली उड्डाण पूल, कोपर, आयरे, गणेशनगर, कुंभारखाणपाडा सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे. हा परिसर उल्हास नदी काठी येतो. आयरे गावातील अनेक चाळी जलमय झाल्या आहेत.