शेतकरी, फिरते व्यापारी, दुकानदारांची ऐन हंगामात कोंडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सागर नरेकर- आशीष धनगर, लोकसत्ता

ठाणे : करोना विषाणूच्या संकटात ग्रामीण अर्थचक्रातील महत्त्वाचा भाग असलेले आठवडी बाजार पूर्णत: ठप्प झाले आहेत. ठाणे जिल्ह्य़ातील कल्याण, भिवंडी, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, तर पालघर जिल्ह्य़ातील वाडा, मोखाडा या तालुक्यांतील महत्त्वाचे बाजार बंद असल्याने फिरते व्यापारी, दुकानदार, छोटे उपाहारगृह यांची ऐन हंगामात कोंडी झाली आहे. आर्थिक चक्र थांबल्याने भविष्याचे नियोजन करायचे कसे, असा सवाल छोटय़ा व्यापाऱ्यांसमोर आहे. पावसाळय़ापूर्वी करायच्या दुरुस्ती, शेती अवजारे, अन्न-धान्य खरेदी बंद पडल्याने ग्रामीण भागातील शेतकरी, आदिवासींनाही पुढचे चार महिने कसे काढायचे, असा प्रश्न पडला आहे.

करोनाच्या संकटात ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या आठवडी बाजारांना सर्वाधिक फटका बसला आहे. आठवडी बाजारांच्या निमित्ताने तालुक्यातील फिरते व्यापारी, शेतकरी, दुकानदार आणि विक्रेते यांचा व्यवसाय होतो. या बाजारांमध्ये भाजीपाला, फळे यांच्यासह कडधान्य, कपडे, सुकी मासळी, गावठी कोंबडी, बाबूंच्या टोपल्या, लाकडय़ाच्या वस्तू, शेती अवजारे आणि हंगामी वस्तूंची मोठय़ा प्रमाणावर विक्री होत होती. पावसाळ्यापूर्वी करायच्या शेतीच्या कामासाठी आवश्यक लोखंडी, लाकडी अवजारे, नाल, पागा, नांगर दुरुस्ती अशी कामे करण्यासाठी हे आठवडी बाजार महत्त्वाचे ठरत होते. पावसाळ्यापूर्वी घरदुरुस्ती, छप्पर दुरुस्तीच्या कामांसाठीची आवश्यक साधनसामग्री मिळण्यासाठीही आठवडी बाजारांवर अवलंबून राहावे लागत होते. अनेक बाजारांत गाई, म्हशी, बैल आणि बकऱ्यांची खरेदी-विक्रीही होत होती. आठवडी बाजार बंद पडल्याने या खरेदी-विक्रीला मोठा फटका बसला आहे.

‘या दोन महिन्यांत चांगले उत्पन्न मिळत असते, मात्र यंदा काही हाती लागणार नाही,’ असे विक्रेते दिनेश पाटील सांगतात, तर बाजारांमधील हॉटेलांमध्येही गावकऱ्यांची गर्दी होत असते. बाजार बंद पडल्याने आमच्यासारख्यांचे अनेक छोटय़ा हॉटेल सध्या बंद आहे. आम्ही खरेदी केलेला कच्चा माल वाया जाणार असून दुहेरी फटका बसला असल्याचे मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथील हॉटेल मालक दीपक गायकवाड सांगतात. ग्रामीण भागातील शेतकरी, आदिवासींसाठीही हा तयारीचा काळ असतो. याच काळात बाजार बंद पडल्याने फिरत्या व्यापाऱ्यांसह शेतकरी आणि आदिवासींना मोठा फटका बसत आहे.

कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा?

जिल्ह्य़ातल्या विविध बाजारांमध्ये कापडविक्री करणाऱ्या वाडा तालुक्यातील सविता तांडेल यांच्या ६ सदस्यांचे कुटुंब सध्या टाळेबंदी उठण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. मार्चपासून उत्पन्नाचा स्रोत पूर्णत: बंद झाला असून कुटुंबासमोर आर्थिक संकट उभे असल्याचे त्या सांगतात. हे असेच सुरू राहिले तर उपासमारीची वेळ येईल, असेही त्या सांगतात.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weekend markets complete standstill in rural area due to coronavirus crisis zws
First published on: 28-04-2020 at 04:09 IST