ठाणे : वीकेंडला ‘कुठे जावं?’ हा प्रश्न अनेकांना सतावतो. कमी वेळात, कमी खर्चात आणि शहराच्या जवळपासच एखादे सुंदर ठिकाण गाठण्याचा अनेकांचा कल असतो. ठाणे शहरात असे अनेक छुपे पर्यटनस्थळे आहेत की जे वीकेंड खास, मजेशीर आणि स्मरणीय करू शकतात. निसर्गरम्य ठिकाणं, आणि शांत वातावरण असलेली ही ठिकाणं तुमच्या नक्कीच पसंतीस पडतील.

१) द वॉक

द वॉक हे ठाणे पश्चिमेतील एक परिपूर्ण ठिकाण आहे. जिथे तुम्ही आपल्या कुटुंबासोबत आणि मुलांसोबत आनंददायी वेळ घालवू शकतात. गेम झोनपासून फूड कोर्टपर्यंत येथे सर्व काही उपलब्ध आहे. आकर्षक अशी सजावट, विद्यूत रोषणाईमुळे ही जागा प्रत्येकाला भूरळ पाडते.

पत्ता – हिरानंदानी इस्टेट रोड, हिरानंदानी इस्टेट, ठाणे पश्चिम, ४००६०७.

२) गायमुख चौपाटी

गायमुख चौपाटी ठाण्याच्या घोडबंदर रोडलगत वसलेली एक निसर्गरम्य जागा आहे.कुटुंबासोबत तसेच मित्र-मैत्रिणींसह वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. याठिकाणी नौकाविहार (बोटिंग ) ची सुविधा उपलब्ध आहे. शहराच्या धकाधकीतून थोडा वेळ शांततेत घालवण्यासाठी या चौपाटी ला नक्कीच भेट दिली पाहिजे. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी येथील प्रकाश व दृश्ये अतिशय आकर्षक दिसतात. हे क्षण टिपण्यासाठी फोटोग्राफर्स देखील येथे येत असतात.

पत्ता : गायमुख चौपाटी, घोडबंदर रोड, गायमुख मंदिराच्या शेजारी, ठाणे (पश्चिम) ४००६१५

३) फुलपाखरु उद्यान

ठाणे शहरात फिरण्यासाठीच्या सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक म्हणजे एल्विस बटरफ्लाय गार्डन आहे. या उद्यानात रंगीबेरंगी फुलपाखरांच्या १३२ हून अधिक प्रजाती पाहायला मिळतात. हे एक खुले फुलपाखरांचे उद्यान आहे. याठिकाणी भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला उद्यानात असलेले मार्गदर्शक बागेचा फेरफटका घडवतात आणि फुलपाखरांच्या जीवनचक्राच्या विविध टप्प्यांबद्दल माहिती देतात. हे उद्यान केवळ रविवारी खुले असते. निसर्गप्रेमींनी याठिकाण अवश्य भेट दिली पाहिजे. या उद्यानात प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

पत्ता : वॉर्ड क्रमांक १, व्हिलेज रोड, गौणिवाडा, ओवळे, ठाणे, ४००६१५.

४) कासारवडवली धबधबा

घोडबंदर भागातील कासारवडवली परिसरात हा छुपा धबधबा आहे. या धबधब्याकडे जाणारा मार्ग संपूर्ण हिरवाई ने नटलेला आहे. या ठिकाणी पक्ष्यांचा किलबिलात पाहायला मिळतो. तसेच या धबधब्याकडे जाताना ट्रेकिंग चा अनुभव देखील घेता येतो.

पत्ता : कासारवडवली धबधबा, ज्ञानगंगा कॉलेज जवळ, कासारवडवली, घोडबंदर, ठाणे (पश्चिम).

५) सेंट्रल पार्क ठाणे (NaMo Grand Central Park)

NaMo Grand Central Park हे ठाण्यातील कोळशेत रोडवर वसलेलं महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्वात मोठे शहरी पार्क आहे. हे पार्क सध्याच्याघडीला आकर्षक पार्क बनले आहे. याठिकाणी मोघल, जपानी, चायनीज, मोरोक्कन अशा विविध संस्कृतींची प्रेरणा असलेले थीम गार्डन्स आहेत.

प्रत्येक गार्डनमध्ये खास झाडं, फुलं, आणि रचना पाहायला मिळते. या पार्क मधील X-ब्रिज ही एक आकर्षक आणि फोटोजेनिक रचना आहे. लहान मुलांसाठी खेळण्याची विविध साधनं, झिप लाइन, वॉटर प्ले असे विविध खेळ आहेत.

पत्ता : नमो ग्रँड सेंट्रल पार्क कल्पतरू पार्कसिटी, कोळशेत रोड, ठाणे पश्चिम, ४००६०७