|| पूर्वा साडविलकर

संस्थाचालकांकडून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न ; नागरिकांना करोना लसीकरण करण्याचे आवाहन

ठाणे :  जिल्ह्यातील शहरांमध्ये मराठी नववर्षानिमित्त निघणाऱ्या स्वागत यात्रा गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही करोना संकटामुळे रद्द झाल्या आहेत. यात्रा रद्द होत असल्या तरी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी संस्थाचालकांनी पुढाकार घेतला आहे. राज्यात मे महिन्यात दरवर्षीच रक्ताचा तुटवडा निर्माण होत असतो. यंदा लसीकरण मोहीम सुरू असल्याने रक्तदात्यांचे प्रमाणही काही प्रमाणात घटले आहे. हे लक्षात घेऊन ठाणे, डोंबिवली तसेच आसपासच्या स्वागत यात्रा आयोजकांनी नववर्षानिमित्त रक्तदानाचे उपक्रम हाती घेतले आहेत. याशिवाय करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी जनजागृतीचे प्रयत्नही केले जात असून यासाठी मोठ्या प्रमाणावर समाजमाध्यमांचा उपयोग केला जात आहे.

दरवर्षी मराठी नववर्षानिमित्त जिल्ह्यातील विविध शहरांत स्वागत यात्रा काढल्या जातात. त्यापैकी ठाणे आणि डोंबिवली शहरात मोठ्या स्वागत यात्रा निघतात. वर्षानुवर्षे या स्वागत यात्रांमधून लहान मुलांपासून ते ज्येष्ठापर्यंत सर्व वयोगटांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. या स्वागत यात्रांच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश देण्यात येतात. तसेच वेगवेगळ्या संकल्पना घेऊन या यात्रेचे आयोजन करण्यात येत असते. यासाठी आयोजक चार ते पाच महिने आधीपासून तयारीला लागलेले असतात. गेल्यावर्षी या स्वागत यात्रेची आयोजकांकडून मोठ्या उत्साहात तयारी करण्यात आली होती. मात्र मार्चमध्ये पसरलेल्या करोना विषाणूमुळे आयोजकांना स्वागत यात्रा रद्द करावी लागली होती. तसेच यावर्षीही करोनाचे संकट कायम असल्यामुळे स्वागत यात्रेविषयी प्रश्नचिन्ह कायम आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आयोजकांनी यंदाही स्वागत यात्रा रद्द केली आहे. रक्तदान, लसीकरण तसेच करोनाविषयक जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत शिबीरं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यात रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. ठाण्यातील श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे स्वागत यात्रा काढण्यात येत असते. करोना संकटामुळे आयोजकांकडून स्वागत यात्रा रद्द करण्यात आली आहे. मात्र, स्वागत यात्रेत खंड पडत असला तरी सामाजिक बांधिलकी म्हणून या संस्थाचालकांनी यंदा नववर्षानिमित्त नागरिकांमध्ये रक्तदानाविषयी जनजागृती करण्याचे ठरविले आहे. यासाठी गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत ठाण्यातील कै. वामनराव ओक रक्तपेढीमध्ये नागरिकांनी जाऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तर, डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थानचादेखील अशाच प्रकारचा उपक्रम आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.