ठाणे : मुंबईतील नौदलाच्या प्रतिबंधित क्षेत्राबाबत महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरविल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या कळवा येथील रवी वर्माला (२७) सोमवारी दुपारी ठाणे न्यायालयात न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. माझी दहशदवादी विरोधी पथकाविषयी (एटीएस) काही तक्रार नाही. परंतु मी खूप घाबरलेलो आहे, असे तो न्यायाधीशांना म्हणाला.
कळवा भागात राहणाऱ्या रवी वर्मा याला एटीएसच्या पथकाने काही दिवसांपूर्वीच अटक केली होती. त्याला सोमवारी दुपारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. रवी वर्मा याने कोर्टात प्रवेश करताना पांढरा शर्ट आणि जिन्स परिधान केली होती. न्यायाधीशांसमोर सुनावणीसाठी रवी वर्माला हजर केल्यानंतर त्याला न्यायाधीशांनी त्याचे नाव विचारले. त्याने नाव सांगितल्यानंतर एटीएसबाबत काही तक्रार आहे का? असे न्यायाधीशांनी त्याला विचारले. गांगरलेल्या वर्मा याने सांगितले की, माझी एटीएसबाबत काही तक्रार नाही. परंतु मी खूप घाबरलेलो आहे. त्यानंतर सरकारी वकील आणि वर्मा याच्या वकिलांनी युक्तीवाद सुरू केला.
या प्रकरणाचा आणखी तपास आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायाधीशांसमोर युक्तीवाद मांडला. तर आम्ही प्रत्येक वेळी एटीएसच्या तपासात सहकार्य केले होते. परंतु आता कोणतीही नोटीस न बजावता रवी याला अटक करण्यात आल्याचा दावा वर्मा याच्या वकिलांनी केला. २६-२७ वर्षांचा मुलगा असे काही करणार नाही, एटीएसच्या पथकाला आवाजाचे नमूने घ्यायाचे होते. ते त्यांनी घेतले आहेत असेही ते म्हणाले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी वर्मा याला ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.