ठाणे : करोनानंतर म्हणजेच गेल्या सहा वर्षांपासून बंद पडलेली ठाणे वर्षा मॅरेथाॅन स्पर्धा आज पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वज दाखवून मॅरेथॉनला सुरुवात केली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे स्वत: देखील मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. पालिका मुख्यालय ते पाचपाखाडी येथील साईबाबा मंदिरापर्यंत ते धावत होते. शिंदे यांना धावताना पाहून स्पर्धकांमध्ये अनोखा उत्साह निर्माण झाला होता. यावेळी त्यांच्यासोबत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव देखील सहभागी झाले होते.

ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानेही राज्य पातळीवर मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेत मुंबई ठाण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातून अनेक स्पर्धक सहभागी होत असतात. त्याचप्रमाणे आर्मीमधील नामवंत खेळाडू सहभागी होत असतात. देश आणि जागतिक पातळीवर धावपट्टू निर्माण करणे या उद्देशातून ही स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेत शहरातील विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत असे सर्वजण मोठ्या संख्येने सहभागी होतात.

२१ ते ५ किमी अंतरपर्यंतची स्पर्धा असते. या स्पर्धेच्या माध्यमतून विविध सामाजिक संदेश दिले जातात. ही स्पर्धा आता सहा वर्षांनंतर होणार आहे. या स्पर्धेत ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्त राव यांनी केले आहे. करोनानंतर गेले सहा वर्ष या मॅरेथॉनमध्ये खंड पडला होता. यंदाच्या वर्षी १० ऑगस्ट ला या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मॅरेथॉनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ध्वज दाखवून मॅरेथॉनला सुरुवात केली. त्यानंतर, स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी शिंदे यांनी देखील मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

काउंट डाऊन संपताच शिंदे यांनी महापालिका मुख्यालयापासून धावायला सुरुवात केली. त्यांच्यासह महापालिका आयुक्त सौरभ राव आणि शिवसेना (शिंदे गटाचे) काही पदाधिकारी सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रस्त्यावर धावताना पाहून नागरिक आश्चर्यचकित झाले होते. शिंदे यांना धावताना पाहून लाडक्या बहिणी देखील उत्साहाने मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. महापालिका मुख्यालयापासून शिंदे यांनी धावायला सुरुवात केली ते पाचपाखाडी येथील साईबाबा मंदिरापर्यंत ते धावत होते. त्यांचा हा उत्साह पाहून तरुणमंडळी देखील प्रोत्साहीत झाले होते.