अंगारकी चतुर्थी २०२५, श्रावण २०२५ ठाणे : २१ वर्षांनंतर दुर्मीळ असा धार्मिक योग जुळून आला आहे. यावर्षी मंगळवार, १२ ऑगस्ट रोजी अंगारकी चतुर्थी आणि श्रावण महिना एकत्र आल्याने भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. तर,मंदिरे आणि पूजा स्थळांवर विशेष कार्यक्रमांची तयारी सुरू आहे. ठाणे शहरातही गणपतीची काही मंदिरे प्रसिद्ध असून या मंदिरात तुम्ही अंगारकी चतुर्थीला भेट देऊ शकतात आणि ही मंदिर तुमच्या नक्कीच पसंतीस पडतील.
ठाणे जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध गणपती मंदिर प्रत्यक्षात टिटवाळ्यात आहे जे की ठाणे शहराबाहेर आहे. त्यामुळे अनेक ठाणेकरांना त्या मंदिरात जाणे शक्य होत नाही. परंतु, ठाणे शहराच्या हद्दीत देखील असे काही महत्त्वाची गणपती मंदिरे आहेत की, त्या मंदिरात गेल्यावर तुम्हाला प्रसन्न तर वाटेलच शिवाय तुम्हाला गणपतीचे दर्शन देखील उत्तम मिळेल.
१) श्री सिद्धिविनायक मंदिर
ठाणे स्थानक परिसरापासून काही अंतरावर वसलेल्या जांभळी नाका बाजारपेठ परिसरात श्री सिद्धिविनायक मंदिर आहे. या मंदिरात सकाळ- संध्याकाळ भाविक दर्शनासाठी येत असतात. तर, मंगळवारी या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी अशा महत्वाच्या दिवशी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
पत्ता: श्री सिद्धिविनायक मंदिर, शिवाजी पथ, जांभळी नाका बाजारपेठ, ठाणे ( पश्चिम).
२) भक्त कल्याण गणपती मंदिर
निसर्गरम्य उपवन तलाव हा ठाण्यातील लोकप्रिय विरंगुळ्याचा ठिकाण असले तरी या उपवन तलावाजवळ वसलेले भक्त कल्याण गणपती मंदिर सर्वांसाठी श्रद्धेचे स्थान आहे. निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या या मंदिरात अनेक भाविक दर्शनासाठी येतात. संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी च्या दिवशी या मंदिरात भाविकांची गर्दी होत असते.
पत्ता : भक्त कल्याण गणपती मंदिर, उपवन तलावाजवळ, पोखरण २ परिसर, ठाणे (पश्चिम)
३) श्री गणेश मंदिर
ठाणे शहरातील यशोधन नगर या लोकवस्तीच्या परिसरात हे श्री गणेश मंदिर वसलेले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांसाठी तसेच व्यापाऱ्यांसाठी हे श्रद्धास्थान आहे. अनेकजण त्यांच्या दिवसाची सुरुवात श्री गणेश मंदिरातील गणपतीच्या दर्शनाने करतात. या मंदिरात देखील संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थीला धार्मिक कार्यक्रम राबविले जातात.
पत्ता : श्री गणेश मंदिर, यशोधन नगर परिसर, ठाणे (पश्चिम)
४) श्री मोरेश्वर मंदिर
ठाणे शहरातील राबोडी परिसरात हे श्री मोरेश्वर मंदिर वसलेले आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुंदर असे तुळशी वृंदावन आहे. या मंदिराचा आवार मोकळा आणि स्वच्छ आहे. त्यामुळे भाविकांना इथे आणखी प्रसन्न वाटते. दर मंगळवारी आणि संकष्टी तसेच अंगारकी चतुर्थी ला या मंदिरात भाविकांची गर्दी असते.
पत्ता : आकाशगंगा कॉम्प्लेक्स, राबोडी,ठाणे (पश्चिम )
अंगारकी चतुर्थीचे महत्त्व
प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्ष किंवा शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपतीची पूजा केली जाते. पण चतुर्थीचा दिवस जर मंगळवारी आला, तर तिला “अंगारकी चतुर्थी” म्हणतात.‘अंगारक’ हा मंगळ ग्रहाचा अधिपती आहे. मंगळवार हा मंगळ ग्रहाचा वार असल्याने, मंगळवारी आलेली चतुर्थी “अंगारकी” म्हणून ओळखली जाते.धार्मिक मान्यतेनुसार, अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने सर्व चतुर्थी व्रतांचे पुण्य मिळते.