Thane Municipal Corporation ठाणे : शहराचे केंद्रबिंदू असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतन नुतनीकरणानंतर १५ ऑगस्ट पासून रसिक प्रेक्षकांसाठी खुले झाले. परंतू, प्रत्यक्षात रंगायतन खुले होऊन आठवडा झाला तरी, अद्याप एकही नाटकाचा प्रयोग रंगायतनामध्ये लावण्यात आलेला नाही. गेले आठवडाभर विविध राजकीय पक्ष्यांचे सांस्कृतीक कार्यक्रम तसेच मेळावे याठिकाणी सुरु आहेत. त्यामुळे रसिक प्रेक्षकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

नुतनीकरणाच्या कामानिमित्त राम गणेश गडकरी रंगायतन ऑक्टोबर २०२४ पासून बंद होते. त्यावेळी पवारनगर येथील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात नाट्यरसिकांचा भार वाढला होता. गडकरी रंगायतन हे शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे या नाट्यगृहात येणे प्रत्येकाला सोयीस्कर पडते. त्यामुळे नाट्यप्रेमी रसिक कधी एकदा गडकरी रंगायतन पुन्हा एकदा खुले होतंय याची वाट पाहत होते. अखेर अकरा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर गडकरी रंगायतनाचा पडदा खुला झाला. विविध सोयीसुविधांनी भरलेल्या या नाट्यगृहात ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्वाहकाची व्यवस्था देखील उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे परिपूर्ण अशा गडकरी रंगायतनात आता नाटकाचे प्रयोग लागण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा नाट्यप्रेमी रसिकांना होती. परंतू, त्यांचा हिरमोड झाला असून अजूनही ते गडकरी रंगायतनमध्ये येण्याच्या प्रतिक्षेतच असल्याचे दिसत आहेत.

गडकरी रंगायतन खुले होताच राजकीय पक्ष्यांचे कार्यक्रम

गडकरी रंगायतनचा पडदा उघडताच शिवसेना (शिंदे गट) वतीने मंगळागौरचा पहिला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर २१ तारखेला याच नाट्यगृहात मनसेच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. परंतू, ऐनवेळेस हा कार्यक्रम रद्द झाला. राजकीय वातावरण गरम झाले असून शिंदेना त्यांच्याच बालेकिल्यात हेरण्यासाठी नाईकांचा जनता दरबार २२ ऑगस्ट रोजी गडकरी रंगायतन येथे भरविण्यात आला होता. तर, २३ तारखेला भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांच्या विश्वास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मंगळागौरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी महापालिकेच्या वतीने याठिकाणी सकाळच्या सत्रात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तर, सांयकाळच्या सत्रात शिवसेना (ठाकरे गट) नेते राजन विचारे यांच्या आनंद चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने देखील एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गडकरी रंगायतनाच्या व्यवस्थापक विभागाकडून देण्यात आली.

गेले अनेक महिन्यांपासून आम्ही गडकरी रंगायतन सुरु होण्याची वाट पाहत होतो. कारण, गडकरी रंगायतन स्थानक परिसरापासून जवळ असल्यामुळे शहराबाहेरील नाट्य रसिकांना देखील या नाट्यगृहात येणे सोयीस्कर पडते. नाट्यगृह सुरु झाले आहे परंतू अद्याप एकाही नाटकाचा प्रयोग याठिकाणी लागलेला नाही याची खंत आहे. नवनविन नाटक येत आहेत. राजकीय कार्यक्रम होतच असतात. त्यामुळे लवकरात लवकर गडकरी रंगायतनात नाटकाचे प्रयोग लावावेत ही विनंती. सचिन वैशंपायन, नाट्यरसिक