ठाणे : दिल्ली येथील लालकिल्ला परिसरात झालेल्या बाँबस्फोटा प्रकरणी एका उर्दु शाळेतील शिक्षकाला एटीएसने मुंब्रा येथून ताब्यात घेतले आहे. अलिकडेच पुण्यातील एका सॉफ्टवेअर अभियंत्याला अल कायदा आणि इतर बंदी घातलेल्या संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या अभियंत्याकडून मिळालेल्या माहितीवरुन एटीएसने मुंब्रा येथील एका शिक्षकाच्या घराची झडती घेतली होती. त्यानंतर मुंब्रा येथील या शिक्षकाला ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.

दरम्यान दिल्लीतील बाॅम्बस्फोट प्रकरणाशी या झाडाझडतीचा काही संबंध आहे का याविषयी अजूनही पुरेशा प्रमाणात स्पष्टता आलेली नाही. परंतु या प्रकरणानंतर पुन्हा एकदा मुंब्रा शहराचे नाव समोर आले. यापूर्वी देखील अशी अनेक प्रकरणे होती ज्यामुळे मुंब्रा शहर आणि दहशतवादी कारवाया असे प्रकार उघड झाले. नेमके मुंब्रा शहर आहे काय, कशी आहे रचना आणि काय आहे बदनामीचा इतिहास जाणून घेऊया……..

मुंब्रा शहर हे ठाणे शहरापासून अवघ्या १० ते १५ किमी अंतरावर आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात हा भाग येतो. पूर्वी हा भाग संवेदनशील म्हणून ओळखला जात असे. मागील काही वर्षांपासून मुंब्रा शहर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. येथून एटीएसच्या पथकाने उर्दु शिक्षकाला ताब्यात घेतले होते. तसेच त्याच्या घरातून काही डिजीटल साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे. मुंब्रा येथील कौसा भागात झालेल्या या कारवाईनंतर आता विविध चर्चा रंगू लागल्या आहे. मुंब्रा शहरात मुस्लिम धर्मियांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. येथील नागरिक प्रामुख्याने व्यापार किंवा वस्तू विक्रीचा व्यवसाय करतात. नोकरपेशा असलेले नागरिक फार कमी प्रमाणात राहतात.

मुंब्रा, संशय आणि कारवाया…

  • २०१६ मध्ये आयसिस ही दहशतवादी संघटनेशी संबंधातून एका संशयिताला मुंब्रा येथून अटक झाली होती.
  • २०१९ मध्ये आयसिस या दहशदवादी संघटनेची संबंध असल्याच्या संशयातून नऊ जणांना ताब्यात घेतले होते. यामध्ये एका १७ वर्षीय मुलाचाही सामावेश होता.
  • २०२१ मध्ये झाकीर हुसेन शेख प्रकरणात मुंब्रा येथील एका तरुणाला पोलिसांनी अटक केली होती.