ठाणे जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेपासून भाजपाला रोखण्यासाठी सहा वर्षापूर्वी बंडखोर शिवसेना नेते आणि आनंद सेनेचे अध्वर्यु एकनाथ शिंदे यांनी जिल्हा परिषदेवर फुलणारे ‘कमळ’ कोमेजून टाकले. आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थानी शिवसेनेला बसविण्यासाठी दुष्परिणामांचा विचार न करता राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांची मोट बांधली. जिल्हा परिषदेवर आघाडीचा झेंडा फडकविला. मात्र आता या आघाडीच्या नेत्यानेच बंडाळी केल्यामुळे जिल्हा परिषदेतील आघाडीची मोट तुटणार का? शिंदे यांच्या शिवसेनेचा भगवा फडकणार का?, असे प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केले जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकीकडे ‘मातोश्री’ला भेट, तर दुसरीकडे शिंदेंना फोन; ठाणे जिल्ह्यातील शिवसेना नेते, पदाधिकाऱ्यांची धावाधाव

शिवसेनेतून बाहेर पडताना आनंद सेनेचे प्रणेते एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी, काँग्रेसची साथ सोडा, असा तगादा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मागे लावला. या दोन्ही पक्षांविषयी शिंदे यांना आलेला तिटकार पाहता, ते ठाणे जिल्हा परिषदेतील काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत राहण्याची सुतराम शक्यता नाही. आघाडीची मोट तोडून ते राज्यातील सत्ता स्थापनेची नवी सुत्रे विचारात घेऊन जिल्हा परिषदेत भाजपाच्या मदतीने शिवसेना, भाजपाचा एकत्रित भगवा झेंडा फडकवतील, असे एका उच्चपदस्थ राजकीय नेत्याने सांगितले.

ठाण्यात एकनाथ शिंदे समर्थकांचा शक्तिप्रदर्शनाचा कार्यक्रम रद्द

ठाणे जिल्ह्यातील महापालिकांवर शिवसेनेचे वर्चस्व असले, तरी अनेक वर्ष शिवसेनेला ठाणे जिल्हा परिषदेत शिरकाव करता येत नव्हता. ठाणे जिल्ह्याच्या शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीची भक्कम मांड आहे. या सामर्थ्याच्या जोरावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ताकद पणाला लावून आपले उमेदवार वेळोवेळी जिल्हा परिषद निवडून आणून परिषदेवरील आपला हक्का अबाधित ठेवत होते. ही रुखरुख एकनाथ शिंदे यांच्या मनात होती. सहा वर्षापूर्वी शिंदे यांनी पूर्ण ताकदीने जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार निवडून आणले. कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेत घुसायचेच असा पण करून भाजपाला डावलून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मदतीने जिल्हा परिषदेत शिरकाव केला.

सत्ता स्थापनेचा आखणीकारच आता राष्ट्रवादी, काँग्रेसला झिडकारून बंडाळीच्या रूपात मैदानात –

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये जिल्हा परिषदेतील घटक पक्ष सोबतीला असल्याने शिंदे यांनी जिल्हा परिषदेतील सत्तेविषयी कधी कुरकूर केली नाही. राज्यातील आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस पक्ष खुपू लागल्याने शिंदे यांनी बंडाळी करून महाविकास आघाडी सरकार डळमळीत केले आहे. ठाणे जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची मोट बांधून सत्ता स्थापनेचा आखणीकारच आता राष्ट्रवादी, काँग्रेसला झिडकारून बंडाळीच्या रूपात मैदानात उतरल्याने जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना स्थापित सत्ताही डळमळीत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल –

ठाणे जिल्हा परिषदेत एकूण ५३ सदस्य आहेत. २०१७ च्या जि. प. निवडणुकीत शिवसेना २६, भाजपा १५, राष्ट्रवादी १०, काँग्रेस १, अपक्ष १ असे सदस्य निवडून आले. जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या १० सदस्यांपैकी नऊ सदस्यांनी, काँग्रेस, अपक्ष सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जि. प. मधील शिवसेनेचे संख्याबळ ३७ आहे. राष्ट्रवादीकडे एक सदस्य आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will anand senas saffron to shine on thane zilla parishad due to eknath shindes revolt msr
First published on: 23-06-2022 at 11:00 IST