ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातून जाणाऱ्या घोडबंदर मार्गावरील कापुरबावडी ते गायमुखपर्यंतचे मुख्य आणि सेवा रस्त्यांची जोडणी करून रस्ता रुंद करण्याचे काम सुरू असतानाच, त्यापाठोपाठ आता मिरा-भाईंदर महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या गायमुख ते काशीमिरापर्यंतचा रस्त्याचे रुंदीकरण करून तो ६० मीटर करण्याचा विचार सुरू झाला आहे. या संदर्भात ठाणे महापालिका मुख्यालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत चर्चा झाली. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि मेट्रो प्रकल्प उभारणीसाठी हे रुंदीकरण महत्वाचे असल्याने त्यासंबंधीचा प्रस्ताव मिरा-भाईंदर महापालिकेमार्फत वनविभागाला पाठविण्याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचे पालिका सुत्रांनी सांगितले.

घोडबंदर मार्ग हा वाहतूकीसाठी महत्वाचा मानला जातो. या मार्गावरून स्थानिक नागरिकांची वाहने तसेच अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. या राज्य मार्गाचे बांधकाम २००१ मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने केले होते. या मंडळाने एका खासगी विकासकडून बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वावर हा रस्ता बांधला होता. या मार्गावरील कापुरबावडी ते गायमुखपर्यंत दोन मार्गिका काँक्रीटच्या तर, एक मार्गिका डांबराची आहे. या मार्गावर मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या मार्गिका, रस्त्याचे गटर हे एमएमआरडीएने मेट्रो कामासाठी अधिग्रहित केले आहेत. तसेच या रस्त्याच्या दोन्ही बाजूस सेवा रस्ते असून ते यापुर्वीच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ठाणे महापालिकेकडे वर्ग केलेले आहेत. घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ते आणि मुख्य रस्ते जोडणीची कामे हाती घेण्यात आली असून ही कामे एमएमआरडीएमार्फत करण्यात येत आहेत. यामुळे कापुरबावडी ते गायमुखपर्यंतचा १०.५० किमी लांबीचा रस्ता आता रुंद होणार आहे. हा रस्ता ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला आहे. त्यापाठोपाठ याच मार्गावरील गायमुख ते फाऊंटन हाॅटेलपर्यंतचा रस्ता रुंद करण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. मात्र, आता गायमुख ते काशीमिरापर्यंतचा रस्त्याचे रुंदीकरण करून तो ६० मीटर करण्याचा विचार सुरू झाला असून या संदर्भात ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत चर्चा झाली.

या बैठकीस, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, उपायुक्त दिनेश तायडे, उपनगर अभियंता विकास ढोले, घोडबंदर रोडचे समन्वयक कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह मिरा-भाईंदर महापालिका, एमएमआरडीए, वन विभाग यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रस्ता रुंदीकरण का ?

घोडबंदर रस्त्यावरील पथकर वसुलीचा कालावधी संपुष्टात येताच २३ फेब्रुवारी २०२१ मध्ये हा रस्ता महामंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केला. यानंतर या मार्गावरील फाऊंटन हाॅटेल ते गायमुख हा एकूण ४.४० किमी लांबीचा रस्ता मिरा-भाईंदरकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तसेच मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीसाठी हा रस्ता ६० मीटर करण्याचा प्रस्ताव मिरा-भाईंदर महापालिकेने तयार केला होता. त्यापाठोपाठ आता मेट्रो प्रकल्पाची उभारणी गायमुख ते काशीमिरापर्यंत केली जाणार आहे. यामुळे आता गायमुख ते काशीमिरापर्यंत ६० मीटर रस्ता करण्याचा विचार सुरू झाला आहे. हा रस्ता वनविभागाच्या हद्दीतून जातो. त्यामुळे या विभागाच्या परवानगीशिवाय हा रस्ता रुंद करणे शक्य होणार नाही. त्यामुळे मिरा-भाईंदर महापालिकेतर्फे रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव वनविभागाला पाठिवण्याबाबत ठाणे महापालिकेत पार पडलेल्या बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.