कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात अत्यवस्थ असलेल्या सविता गोविंद बिराजदार (४३) या महिलेला कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात नेण्यासाठी पाच तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने या महिलेचा रुक्मिणीबाई रुग्णालयात प्रवेशद्वारावर सोमवारी संध्याकाळी मृत्यू झाला. पालिका रुग्णालय प्रशासन आणि रुग्णवाहिका चालकांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
सविता यांना पक्षघाताचा झटका आला होता. त्याच बरोबर त्यांना ब्रेन स्ट्रोकचाही झटका आला. त्यांची प्रकृती गंभीर होत गेल्याने त्यांना रुक्मिणीबाई रुग्णालयातील डाॅक्टरांनी कळवा येथे ठाणे पालिकेच्या रुग्णालयात हलविण्याचे कुटुंबीयांना सांगितले. सविताच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकेसाठी धावाधाव सुरू केली. रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या चार रुग्णवाहिका आहेत. पण त्यामधील तीन रुग्णवाहिका भंगार असल्याने बंद आहेत. एक रुग्णवाहिका सज्ज होती. पण तिच्या चालकाचा वेळकाढूपणा सुरू होता. रुग्णालयाची रुग्णवाहिका येत नाही म्हणून कुटुंबीयांनी १०८ क्रमांकावर संपर्क साधला. ती रुग्णवाहिकाही आली नाही.
पालिकेची रुग्णवाहिका सज्ज असुनही इतर रुग्ण येतात की बघू मग सविताला त्या रुग्णवाहिकेतून पाठवू, अशी भूमिका रुग्णालय प्रशासनाने घेतली. तोपर्यंत सविताचा प्रकृती गंभीर होत गेली. पालिका रुग्णवाहिकेचा चालकही वेळकाढूपणा करत असल्याच्या तक्रारी नातेवाईकांनी केल्या. या कालावधीत सविताची प्रकृती गंभीर होत गेली. पालिका रुग्णालयाच्या बाहेर खासगी रुग्णवाहिका सज्ज असतात. त्या रुग्णवाहिकेची उपलब्धता रुग्णालय प्रशासनाने का करून दिली नाही, असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सविताला कळवा येथे नेण्यासाठी पाच तासाच्या कालावधीत रुग्णवाहिका मिळाली नाही, अखेर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात अत्यवस्थेत सविता बिराजदार यांचा मृत्यू झाला.
दीड वर्षापूर्वी एका भिक्षेकरी महिलेचा रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णवाहिके अभावी मृत्यू झाला होता. पालिका रुग्णालयातील रुग्णवाहिका भंगार झाल्या आहेत. त्या अनेक वेळा बंद असतात. रुग्णवाहिका सज्ज असल्या की या वाहिकांचे चालक चालढकलपणा करतात, असा अनुभव अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितला. अधिक माहितीसाठी पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा शुक्ला यांना संपर्क केला. त्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत असा संदेश भ्रमणध्वनीवरून येत होता.
पालिका वैद्यकीय विभागावर कणखर नियंत्रक नसल्याने आयुक्तांनी शासन सेवेतील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. आयुक्त अभिनव गोयल यांनी याप्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आहेत.
रुग्ण महिलेवर उपचार करण्यासाठी येथे व्यवस्था नव्हती. त्यामुळे त्यांना कळवा येथे स्थलांतरित करण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला होता. रुग्णवाहिकेसाठी महिलेच्या दोन्ही मुलांमध्ये निर्णय होत नव्हता. यात वेळ निघून गेला. नातेवाईक आरोप करत आहेत त्याबद्दल चौकशी केली जाईल.-डाॅ. संदीप पगारे मुख्य वैद्यकीय अधिकारी,रुक्मिणीबाई रुग्णालय.
पालिका रुग्णालयांमध्ये रुग्णसेवेच्या नावाखाली निष्पाप लोकांचे बळी घेतले जात आहेत. आयुक्तांनी शासन सेवेतील कणखर वैद्यकीय आरोग्य अधिकारी आणावा. महिलेच्या मृत्यूला जबाबदार डाॅक्टर, रुग्णवाहिका चालकावर कठोर कारवाई करावी.-दीपेश म्हात्रे जिल्हाप्रमुख,
ठाकरे गट, डोंबिवली.