कल्याण – शेअरमधील गुंतवणुकीत कमी कालावधीत झटपट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन माध्यमातून चार भामट्यांनी कल्याणमधील बेतुरकरपाडा भागातील एका महिलेची ६० लाख ५५ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. मे, जून आणि जुलै या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. या फसवणूक प्रकरणी महिलेने चार जणांच्या विरुध्द महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल करून घेतला आहे.

पंकज भारद्वाज, गोपाळ लोराया, भाग्यश्री आणि प्रीती अशी गुन्हा दाखल इसमांची नावे आहे. त्यांचे नाव, गाव पत्ते माहिती नसल्याचे तक्रारदार महिलेने पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार महिला यापूर्वी मुंबईत विमा कंपनीत नोकरीला होत्या. त्यांनी नोकरी सोडली आहे. त्यांच्या बहिणीने मेमध्ये एक जुळणी पाठवून यामध्ये शेअर गुंतवणूक विषयक माहिती असल्याचे आपल्या बहिणीला सांगितले. तक्रारदार महिलेने ती जुळणी उघडली. त्यानंतर त्यांना शेअर गुंतवणूक, त्या विषयीचे मार्गदर्शन आणि नफा झाल्यानंतर करावयाच्या अत्यावश्यक गोष्टी याविषयीची माहिती मिळाली.

जुळणी उघडल्यानंतर ऑनलाईन माध्यमातून गुन्हा दाखल इसमांनी वेगवेगळ्या जुळण्या पाठवून तक्रादार महिलेला त्या उघडण्यास सांगून त्यांना मार्गदर्शन केले. त्यांची व्यक्तिगत आणि बँक व्यवहार विषयक माहिती मागवून घेतली. गुंतवणूक विषयक प्राथमिक माहितीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी फसवणूक झालेल्या महिलेकडून ९९९ रूपये भरून घेण्यात आले. ही माहिती देण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून कोणीही दिसत नव्हता. त्यामुळे तक्रारदार महिलेने शंका उपस्थित केली होती. त्याला गुन्हा दाखल इसम उत्तर देत नव्हते.

गुन्हा दाखल इसमांनी तक्रारदार महिलेला हळूहळू शेअर गुंतवणूक करण्यास सांगितले. करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर फसवणूक झालेल्या महिलेला ऑनलाईन माध्यमातून नफा दिसू लागला. नफा मिळतोय या आमिषाने तक्रारदार महिला शेअरमध्ये गुंतवणूक करू लागली. गुन्हा दाखल इसमांनी दिलेल्या बँक खात्यावर महिलेने ५० हजार रूपयांपासून ते एक लाखाच्या रकमा पाठविल्या. या गुंतवणुकीवर महिलेला ऑनलाईन माध्यमातून नफा दिसू लागला. ही रक्कम सुमारे ५८ लाख दिसू लागली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नफ्याची रक्कम काढण्याची इच्छा महिलेने प्रदर्शित केली. त्यावेळी त्यांना ऑनलाईन मार्गदर्शकांनी रक्कम काढायची असेल तर पहिले ८० लाखाची रक्कम भरणा करावी लागेल असे सांगितले. त्याशिवाय ती रक्कम काढता येणार नाही, असे सांगितले. एवढी रक्कम मी भरू शकत नाही असे सांगुनही ऑनलाईन भामटे मूळ आणि नफ्याची रक्कम काढून देण्यास तयार होत नव्हते. आपली मूळ रक्कम आपणास काढता येत नाही. आणि वाढीव रक्कम भरणे शक्य नाही. त्यामुळे भामटे आपली फसवणूक करत आहेत याची खात्री पटल्यावर महिलेने सायबर गुन्हे शाखा आणि त्यानंतर महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.