कल्याण- औरंगाबादहून येत असलेली राज्यराणी एक्सप्रेस सोमवारी पहाटे मुंबईच्या दिशेने धावत होती. आंबिवली-शहाड रेल्वे स्थानकांच्या दरम्यान या एक्सप्रेसवर लगतच्या झोपडपट्टीमधून एका अज्ञात इसमाने एक्सप्रेसच्या दिशेने दगड फिरकावला. हा दगड खिडकी जवळ बसलेल्या दिवा येथील महिलेच्या डोळ्याला लागला. या महिलेच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. या भागातील इसमाचा लोहमार्ग पोलीस शोध घेत आहेत.
हेही वाचा- ठाणे: कामगार नेते राजन राजे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
राज्यराणी एक्सप्रेसमधून प्रवास करत असलेल्या रमाबाई पाटील (५५) या महिला डोळ्याला दगड लागल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. आंबिवली, शहाड दरम्यानच्या झोपडपट्टीतून हा दगड फेकण्यात आला आहे. दगड फेकल्यानंतर प्रवासी गांगरुन जातो. अशावेळी प्रवासी दरवाजात उभा असेल तर त्याच्या हातामधील मोबाईल, पैशाचा बटवा किंवा घड्याळ हिसकावून जाणे ही या भागातील पध्दत आहे. या भागात कायमस्वरुपी पोलीस तैनात असणे आवश्यक आहे. तुटपुंज्या पोलीस बळामुळे पोलीस याठिकाणी तैनात राहू शकत नसल्याने हे प्रकार वारंवार घडतात, असे कल्याण कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे शैलेश राऊत यांनी सांगितले.