रजिता जाधवला आरटीओकडून परवाना; शहरात प्रथमच महिला रिक्षाचालक
डोंबिवलीत प्रथमच एका महिलेकडून रिक्षाचे सारथ्य केले जाणार आहे. येथील परिवहन व्यवस्थेचा सावळा गोंधळ असल्याने डोंबिवलीकरांना अंतर्गत वाहतुकीसाठी रिक्षा हे दळणवळणाचे प्रमुख साधन आहे. गेली चाळीस वर्षे या शहरात एकही महिला रिक्षाचालक नव्हती. यंदा प्रथमच रजिता शिवराम जाधव या तरुणीने रिक्षाचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आहे. रजिताला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोमवारी कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार नाईक यांनी इरादापत्र (परवाना) देऊन तिचा गौरव केला.
विक्रोळी येथे कुटुंबासह राहणारी रजिता बारा वर्षांपूर्वी डोंबिवलीत वास्तव्यास आली. उमेशनगरमध्ये ही तरुणी राहते. घरची आर्थिक परिस्थिती बेताची. त्यामुळे दहावीपर्यंतच शिक्षण पूर्ण केले. हातांना काम दिले पाहिजे म्हणून तिने उमेशनगर भागात एक छापखाना भाडय़ाने चालविण्यास घेतला आहे. रजिताला पहिल्यापासून रिक्षाची आवड. आयुष्यात एक दिवस तरी रिक्षा चालवायचीच, असे ध्येय तिने उराशी बाळगले होते. तिथेही परिस्थिती आड येत होती. शेजारी राहत असलेले रिक्षाचालक राजीव जोशी रजिताला रिक्षाच्या प्रत्येक भागाची, रिक्षा चालविण्याच्या नियमांची माहिती देत असत. अधिकृतपणे रिक्षा चालविण्याचे धडे गिरवण्यासाठी रजिताने श्री गजानन मोटार ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला. तेथे शेखर जोशी, मनोज जोशी यांच्याकडून तिने चालक प्रशिक्षणाचे धडे गिरवले.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ऑनलाइन पद्धतीने रिक्षा परवान्यासाठी अर्ज भरला. परवान्याच्या यादीत क्रमांक आल्यावर, आता रिक्षा कशी काय खरेदी करायची, असा प्रश्न रजितासमोर उभा ठाकला. एक होतकरू तरुणी धडाडीने व्यवसाय करण्यासाठी पुढे येत असेल तर तिला सहकार्य केले पाहिजे, म्हणून ‘आरटीओ’ नंदकुमार नाईक, सुरेश ऑटोचे खूपचंद शेजवानी यांनी पुढाकार घेऊन एका बँकेच्या माध्यमातून रजिताला रिक्षेसाठी कर्ज मिळवून दिले. रिक्षा चालविण्यासाठी ती सज्ज झाली आहे. अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाल्याने रजिताला आकाश ठेंगणे झाले आहे.
४१ महिलांना परवाने
रिक्षांचे परवाना देताना यापुढे महिलांना पाच टक्के आरक्षण ठेवण्याचे शासनाचे आदेश आहेत. कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) ऑनलाईन पद्धतीने काही महिन्यापूर्वी ३ हजार ७२५ परवान्यासाठी अर्ज आले होते. या अर्जांमध्ये ४१ महिलांच्या अर्जांचा समावेश होता. ‘जागतिक महिला दिनाचे’ औचित्य साधून ४१ महिलांना विनाविलंब इरादापत्र वाटप करण्यात आले आहे. महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत हा संदेश समाजात जावा, या उद्देशाने आरटीओने या महिलांना इरादापत्र वाटपाचा निर्णय घेतला, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार नाईक यांनी सांगितले.