महिलांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा म्हणून राज्य शासनाने महिलांना रिक्षा चालविण्याचे परमिट देण्यास सुरुवात केली असतानाच आता त्यापाठोपाठ महिलांच्या रिक्षाचा रंग अबोली करण्याचा निर्णय शासनाने सोमवारी घेतला आहे. महिला चालकाची रिक्षा ओळखता यावी म्हणून शासनाने हा निर्णय घेतला आहे.
स्वप्नाली लाड या तरुणीचे चालकाने अपहरण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिने चालत्या रिक्षातून उडी घेतल्याची घटना दोन वर्षांपूर्वी ठाण्यात घडली होती. या घटनेला सहा महिने होत नाहीत तोच दोन तरुणींच्या बाबतीत पुन्हा असाच काहीसा प्रकार घडला. या दोघींनीही चालत्या रिक्षातून उडी घेतली होती, या दोन्ही घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पाश्र्वभूमीवर ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने महिलांना रिक्षा चालविण्याचे परमिट देण्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. या प्रस्तावाच्या आधारे राज्य शासनाने महिलांना रिक्षा परमिट देण्याचा निर्णय घेतला. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने महिला चालकांना परमिट देण्यासंबंधी पाठविलेल्या प्रस्तावात त्यांच्या रिक्षांचा रंग वेगळा असावा, असे सुचविले होते. या संदर्भात सोमवारी राज्य शासनाने अंतिम निर्णय घेतला असून त्यामध्ये महिला चालकांच्या रिक्षांचा रंग अबोली केला आहे. या संदर्भात अप्पर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांनी गृह विभागाला पत्र पाठविल्याचे सुत्रांनी सांगितले. यामुळे महिला प्रवाशांना आता महिला चालकाची रिक्षा ओळखणे सोपे होणार आहे.
- राज्यात सुमारे पाचशे महिला चालकांना परमिट देण्यात आले असून त्यापैकी ८९ महिला ठाण्यातील आहेत.
- परंतु त्या रिक्षाचा रंग काळा आणि पिवळाच ठेवला होता. त्यात कोणतेही बदल केले नव्हते. त्यामुळे रिक्षाचालक महिला असल्याचे प्रवासी महिलांना ओळखणे शक्य होत नव्हते.