डोंबिवली – डोंबिवलीतील ९० फुटी रस्ता, खंबाळपाडा, एमआयडीसी परिसरात पुन्हा भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला आहे. गणेशोत्सवाच्या काळात महिला सोन्याचे दागिने घालून गणपती दर्शनासाठी जातात. हे लक्षात घेऊन भुरटे चोर दुचाकीवरून येऊन पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज हिसकावून पळून जात आहेत. बुधवारी संध्याकाळी ठाकुर्ली, आजदेगाव हद्दीत एक तासाच्या अंतराने दोन पादचारी महिलांच्या गळ्यातील दोन लाखाचे सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या भुरट्या चोरांनी हिसकावून लुटून नेले.

स्थानिक पोलिसांनी काही महिन्यापूर्वी या भुरट्या चोरांमधील काही जणांना अटक केली होती. त्यानंतर डोंबिवली, कल्याण परिसरातील विविध भागात दुचाकीवरून येऊन पादचारी महिलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटून नेण्याच्या घटना थांबल्या होत्या. सकाळ, संध्याकाळ ठाकुर्ली ९० फुटी रस्ता भागात शहर परिसरातील नागरिक चालण्यासाठी येतात.

रामनगर पोलिसांनी सांगितले, डोंबिवलीतील खंबाळपाडा भागात चामुंडा गार्डन सोसायटीत राहणाऱ्या थंकमणी नायर (६५) बुधवारी संध्याकाळी साडे चार वाजता जवळील किरणा दुकानात सामान घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्या गळ्यात सोन्याची साखळी आणि इतर सोन्याचा ऐवज होता. या ऐवजाची किंमत सुमारे एक लाख दहा हजार रूपये होती.

दुकानात जात असताना दोन भुरट्या चोरट्यांनी तक्रारदार थंकमणी यांना पाहिले आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज हिसकावून पळून जाण्याचा कट रचला. थंकमणी दुकानातून सामान घेऊन पायी घरी जाण्यास निघाल्या. तेवढ्यात त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेल्या दोन चोरट्यांनी थंकमणी सोसायटीच्या प्रवेशव्दाराकडे जात असताना अचानक पाठीमागून जाऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज घाईने हिसकावला. भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या थंकमणी यांना सुरूवातीला काय झाले ते कळले नाही. त्यांच्या मानेला दुखापत झाली आहे. या प्रकारानंतर थंकमणी यांनी रामनगर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार केली. महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक कावळे याप्रकरणाचा तपास करत आहेत.

या घटनेनंतर दुसरा प्रकार आजदेगाव येथे बुधवारी संध्याकाळी साडे पाच वाजता घडला. त्यामुळे थंकमणी यांचा ऐवज चोरणाऱ्या भुरट्यांनीच हा प्रकार केला असण्याचा संशय पोलिसांना आहे. आजदे गावातील रिजन्सी इस्टेटमध्ये राहणाऱ्या कमल बाळाराम म्हात्रे (६५) या बुधवारी संध्याकाळी साडे पाच वाजता रिजन्सी इस्टेट समोरील रस्त्यावरून पायी फिरण्यासाठी चालल्या होत्या. त्यांच्या गळ्यात ५८ हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र होते. काही अंतर पुढे गेल्यानंतर दुचाकीवरून दोन तरुण आले. त्यांनी अचानक कमल म्हात्रे यांच्या दिशेने जोराने दुचाकी नेली. त्या थोड्या बाजुला झाल्या. तोपर्यंत दुचाकीवरील चोरट्यांनी कमल यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज हिसकावून दुचाकीवरून पळ काढला. ते दावडी मानपाडा रस्त्याने पळून गेले.

कमल म्हात्रे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हे भुरटे चोर ज्येष्ठ, वृध्द महिलांना सर्वाधिक लक्ष्य करत आहेत. जाधववाडीतील धर्माभुवनमध्ये राहणाऱ्या रिकी मिश्रा यांच्या घरातून चोरट्यांनी ३४ हजाराचा सोन्याचा ऐवज चोरून नेला आहे.