सामान्य गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून त्यांना कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ७६ लाख ६६ हजार ५०० रूपये रक्कम उकळणाऱ्या कुशाला किरण उचील (२८) या महिलेला कल्याणच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता २४१ अन्वये प्रत्येक कलमांकरिता 3 वर्ष साधा कारावास आणि प्रत्येक कलमाकरिता दोन हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास पुन्हा प्रत्येक कलमाकरिता १५ दिवस साधी कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

मुख्य आरोपी किरण उचील याने स्वतः केजीके असोसिएट्सचा प्रोप्रायटर असल्याचे भेटकार्ड छापून त्यावर स्वत:चा इ-मेल आयडी टाकला. त्याने फाईट फॉर युवर राईट्स, ऑल इंडीया ह्यूमन राईट्स प्रॉटक्शन, केजीके असोसिएट्स अशा वेबसाईटसशी संबंधीत असल्याचे भासवले. प्रत्यक्षात आरोपी किरण याचा सदर वेबसाईट्शी कोणताही संबंध नव्हता. सामान्य रहिवाशांचा विश्वास संपादन करण्याकरिता तसेच लोकांचे लक्ष्य वेधून घेता यावे याकरिता भेटकार्ड छापले. कुशाला ही त्याची पत्नी असून तिला साथ देण्याच्या उद्देशाने सोबत काम करून स्वतःचे बँक खात्याचे धनादेश कर्ज स्वरूपात काही गरजूंना दिले.

मुख्य आरोपी कुशाला हिच्याकडे कायद्याची पदवी नाही. वकिलाची नाममुद्रा शीर्षपत्रावर छापण्याचा तिला अधिकार नाही. तिच्याकडे कोणत्याही प्रकारचा सावकारी कायद्यान्वये परवाना नाही. तरीही तिने डोंबिवली पश्चिमेत कार्यालय थाटून तेथे येणाऱ्या गरजूंचा विश्वास संपादन केला. कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून कुशाला उचील हिने गरजूंकडून टोकन रक्कम म्हणून एकूण ७६ लाख ६६ हजार ५०० रूपये रक्कम उकळले. त्यानंतर दोघांनी कार्यालयाचा गाशा गुंडाळून पळ काढला. या दाम्पत्याच्या विरोधात विष्णुनगर पोलिसांनी महाराष्ट्र सावकारी नियमन अध्यादेश सन २०१४ चे कलम ३९ प्रमाणे गुन्हा दाखल केल्यानंतर न्यायालयात दोषारोप सादर केले होते. तत्कालीन साहाय्यक पोलीस निरीक्षक ए. पी. शिकलगार आणि त्यांच्या पथकाने कुशाला आणि तिचा पती किरण उचील यांना अटक केली. न्यायालयीन समन्वयक एस. सी. रोंगटे, कारकून जी. एम. महाले, न्यायालय अधिकारी के. के. शेख, सरकारी वकील ॲड. भिंगारदेव यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.