ठाणे पूर्व स्थानकातील वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी सॅटीस प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. या कामासाठी रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वेच्या विद्युत वाहिन्या स्थलांतरीत करण्यास आणि इतर बांधकामे हटवण्यास रेल्वे विभागानं नुकताच हिरवा कंदील दाखवला आहे. यापूर्वी अशा परवानग्या मिळण्यासाठी खूप उशीर व्हायचा. त्यामुळे कामं संथगतीने पूर्णत्वास जायची. या कामात मात्र नेमकं उलटं चित्र दिसून येत आहे. रेल्वे आणि पालिका प्रशासनाच्या समन्वयामुळेच कामातील अडथळे दूर होऊन कामाला गती आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

ठाणे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या भागात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमणात असते. त्या तुलनेत रस्ते अपुरे पडू लागल्याने याठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. ही समस्या सोडवण्यासाठी ठाणे पश्चिम रेल्वे स्थानकाप्रमाणेच पूर्व स्थानक परिसरात सॅटीस प्रकल्प उभारणीचं काम सुरू आहे. ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी हे या प्रकल्पाच्या कामाचा सातत्याने आढावा घेत आहेत.

सॅटीस प्रकल्पातील मार्गासाठी खांब उभारणीबरोबरच तुळई बसवण्याची कामं सुरू आहेत. अत्याधुनिक यंत्राद्वारे तुळई बसवण्याचं काम केलं जात आहे. याठिकाणी अनेक तुळई बसवण्याची कामं पूर्ण झाली आहेत. सॅटीसचा डेक उभारण्याच्या कामात अडसर ठरणारी बांधकामं पालिका प्रशासनानं काही दिवसांपुर्वीच हटवली होती. यानंतर आता रेल्वेच्या विद्युत वाहिन्या स्थलांतरीत करण्यासाठी आणि इतर बांधकामे हटवण्यासाठी रेल्वे विभागानं तात्काळ मंजुरी दिली आहे. सॅटीस कामासाठी रेल्वे आणि पालिका प्रशासनाचे अधिकारी गेल्या काही दिवसांपासून समन्वय साधून कामे करत आहे. यामुळेच या कामाला तात्काळ परवानग्या मिळाल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

सॅटिस प्रकल्प नेमका काय आहे?
ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत ठाणे पूर्व भागात सॅटिस प्रकल्प उभारणीचं काम सुरू आहे. याठिकाणी उड्डाणपूल तसेच डेक उभारणीचं काम सुरू आहे. हा डेकची एकूण लांबी १४.५९ मीटर तर उंची ९ मीटर इतकी असणार आहे. त्यामध्ये ४.५० मीटरचा पोटमाळा देखील असणार आहे. पुलाखालून लहान वाहनं जाणार आहेत. पुलाच्या पोटमाळ्यावर रेल्वेचा विश्रांती कक्ष असणार आहे. तर, पुलावर टीएमटी बस, खाजगी कंपन्यांच्या बसगाड्यांचा थांबा, शौचालये, फूड कोर्ट आदी गोष्टी असणार आहेत. याशिवाय, याठिकाणी रेल्वेची आठमजली इमारत असणार आहे.

या पुलामुळे ठाणे पूर्व व पश्चिम भागातील वाहतुकीवरचा ताण बऱ्याच अंशी कमी होण्यास मदत होणार आहे. कोपरी पुलापासून ते स्थानकापर्यंत उड्डाणपूल उभारणीचं काम जवळपास पूर्ण झालं असून केवळ दोन ठिकाणी खांब उभारणीचं काम शिल्लक आहे. या खांबांवर तुळई बसवण्यात आली आहे. या प्रकल्पाचे काम ५० टक्के पूर्ण झालं असून डिसेंबर २०२३ पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो, असा अंदाज पालिका प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे.