ठाणे : ठाणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या वडाळा-घाटकोपर-कासारवडली (मेट्रो चार ) या प्रकल्पातील कापूरबावडी मेट्रो स्थानकाच्या निर्माणातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) एका रात्रीत आठ ‘यु गर्डर’ यशस्वीरित्या बसविण्यात आले. कापूरबावडी मेट्रो हे स्थानक ठाणे-भिवंडी-कल्याण (मेट्रो पाच) या प्रकल्पाचेही प्रमुख स्थानक असणार आहे. त्यामुळे हा टप्पा महत्त्वाचा मानला जातो. गर्डर बसविण्याच्या कामासाठी ९० हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
गेल्याकाही वर्षांमध्ये ठाणे शहरात मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. मुंबई उपनगरांपासून हे शहर जोडले असल्याने येथे वास्तव्यास नागरिक प्राधान्य देतात. नागरिकरण वाढत असताना दुसरीकडे रस्ते मार्गावर वाहनांचा भार वाढत आहे. वाहनांच्या तुलनेत रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे वाहतुक कोंडीचा त्रास चालकांना सहन करावा लागतो. ठाणे शहरातील वाहतुक कोंडी सोडविणे आणि उपनगरीय रेल्वे वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी ठाणे शहरात मेट्रो मार्गिका चार आणि पाच या प्रकल्पाच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या कामाचा भाग म्हणून घोडबंदर, पूर्व द्रुतगती माहमार्गावर अनेक ठिकाणी मेट्रो स्थानक उभारले जात आहेत. परंतु कापूरबावडी या मेट्रो स्थानकाचे काम अतिशय महत्त्वाचे होते. कारण, याच स्थानकातून मेट्रो पाच देखील जोडली जाणार आहे. तसेच कापूरबावडी चौक रस्ते वाहतुकीसाठी महत्वाचा आहे. त्यामुळे या भागात काम करणे अतिशय कठीण होते.
नुकतेच कापूरबावडी मेट्रो स्थानकाच्या कामास वेग आला असून येथे आठ गर्डर उभारण्यात आले. या प्रति गर्डरचे वजन ९७.९२ मेट्रिक टन इतके होते. तर एकूण वजन ७८३.३६ मेट्रिक टन इतके होते. एका रात्रीत हे गर्डर उभारण्यात आले. या कार्यासाठी ९० हून अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते, ज्यामध्ये २८ रिगर, १० कुशल कामगार, २० अकुशल कामगार तसेच ३५ वाहतूक समन्वय अधिकाऱ्यांचा समावेश होता. तसेच विविध प्रकारची यंत्रसामग्री वापरण्यात आली. ज्यामध्ये क्रेन, अवजड वाहने, पुलर यासह इतर वाहनांचा सामावेश होता असे एमएमआरडीएने स्पष्ट केले.