ठाणे : धनगर आरक्षण तसेच समाजाच्या विविध मागण्या जाणून घेण्यासाठी जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेळ नसेल तर आम्हाला देखील तुमची गरज नाही असे सांगत धनगर समाजासाठी काम करणाऱ्या यशवंत सेनेचे प्रमुख माधव गडदे यांनी शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठींबा काढत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली.

यशवंत सेनेचे प्रमुख माधव गडदे यांनी शुक्रवारी ठाण्यातील शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी यशवंत सेना कोषाध्यक्ष बाळासाहेब मोटे, नवी मुंबई जिल्हाप्रमुख अभिजित कोकरे उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कामाचा धडाका व निर्णय घेण्याची क्षमता पाहून यशवंत सेनेने शिवसेना शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीत पाठींबा दिला होता. त्याचा परिणाम म्हणून धनगर समाजाने केलेल्या मतदानात कल्याण लोकसभेसह महाराष्ट्रात अनेक खासदार निवडून आले. संपूर्ण महाराष्ट्रात धनगर आरक्षणाचा विषय पेटलेला असताना मुख्यमंत्री शिंदे यांना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. धनगर आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही.

हे ही वाचा…ठाणे : शेअर बाजारातील गुतंवणूकीच्या माध्यमातून दोघांची लाखो रुपयांना फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समाजाचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. यासाठी अनेक वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु मुख्यमंत्र्यांच्या आजू-बाजूला असलेले काही लोक त्यांना भेटू देत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाज नाराज आहे असे गडदे म्हणाले. समाजाच्या भावना लक्षात घेता आम्ही शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठींबा काढत असल्याची घोषणा यशवंत सेनेचे प्रमुख माधव गडदे यांनी केली. महाराष्ट्रात धनगर मोठ्याप्रमाणात आहे. ठाणे जिल्ह्यात देखील धनगर समाजाचे पावणे तीन लाख मतदार आहेत. तुम्हाला पाठींबा देऊन देखील आम्हाला विश्वासात घेत नसाल तर विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाचे उमेदवार उभे करेल. त्याची सुरुवात ठाण्यातून करू असेही गडदे यावेळी म्हणाले.