कल्याण – सार्वजनिक ठिकाणी लघुशंका का करतोस. ही काय लघुशंका करण्याची जागा आहे का, असे प्रश्न करत एका मद्यपीने शुक्रवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या दरम्यान कल्याणमध्ये मुरबाड रस्त्यावरील मुरार बागमध्ये राहत असलेल्या एका नोकरदार तरूणाला मद्याच्या नशेमध्ये मारहाण केली. त्यानंतर या तरूणाने १५ जणांच्या टोळक्याला सोबत आणले. संबंधित तरूणाला पुन्हा बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्याला रक्तबंबाळ केले.
कौस्तुभ महेंद्र येरपुडे (२७) गंभीर जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. ते मुरबाड रस्त्यावरील मुरार बाग भागात राहतात. ते एका विमा कंपनीत मुंबईत नोकरीला आहेत. ते कल्याण रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी नेहमी आपल्या दुचाकीचा वापर करतात. कामावरून परतल्यावर पुन्हा दुचाकी घेऊन घरी परत येतात. शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजता कौस्तुभ येरपुडे कल्याण रेल्वे स्थानकाजवळून घरी दुचाकीवरून येत होते. मुरबाड रस्त्यावरून जात असताना म्हसकर रूग्णालय चौकाजवळ भगवान मेडिकलच्या बाजुला कौस्तुभ याची दुचाकी बंद पडली. प्रयत्न करूनही दुचाकी सुरू होत नसल्याने कौस्तुभ आणि त्याचा मित्र सचिन डोंबे यांनी दुचाकी लोटत एका वाहन दुरुस्ती कार्यशाळेत आणली. तोपर्यंत रात्रीचे साडे दहा वाजले होते.
बराच अंतर दुचाकी लोटल्याने दोघे घामाघूम झाले होते. लघुशंका आल्याने कौस्तुभ रोहित वाईन्स शाॅपच्या बाजुला असलेल्या अंधाऱ्या ठिकाणी गेले. तेथे ३५ वर्षाचा एक इसम सार्वजनिक ठिकाणी काळोखात मद्यसेवन करत बसला होता. त्या इसमाने कौस्तुभ यांना ही लघुशंका करण्याची जागा आहे का, असे प्रश्न करत कौस्तुभ यांना चापटीने मारहाण केली. तुम्हाला काय अडचण आहे, असे प्रश्न कौस्तुभ यांनी केले. पण मद्यसेवन केलेला इसम ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
कौस्तुभ यांना मारहाण करून निघून गेल्यावर त्या इसमाने सोबत पुन्हा १५ जणांना कौस्तुभ उभा असलेल्या ठिकाणी आणले. त्यांनी कौस्तुभ येरपुडे यांच्याशी पुन्हा हुज्जत घातली. वाद उकरून काढून १५ जणांनी मिळून कौस्तुभ यांना बेदम मारहाण केली. या टोळक्यातील एका इसमाने हातामधील रिकामी बिअरची बाटली रागाच्या भरात कौस्तुभ यांच्या डोक्यात मारली. कौस्तुभ यांनी टोळक्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. एकावेळी १५ जण कौस्तुभ यांच्या अंंगावर आले होते. त्यामधील काही जण मद्यसेवन केलेले होते, कौस्तुभ यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाल्यावर टोळके तेथून पळून गेले.
कौस्तुभ यांनी याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. मारहाण करणारे इसम मद्यसेवना बरोबर गांजा सेवन करणारे असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासून या टोळक्याला अटक करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.