लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : कल्याण, डोंबिवलीत दोन वेगळ्या घटनांमध्ये मोटारींनी दिलेल्या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. कल्याणमधील अपघातात एक शाळकरी विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली. तर, शिळफाटा रस्त्यावरील एक्सपेरीया मॉल येथे दुचाकीवरून रस्ता ओलांडताना एक पादचारी जखमी झाला आहे.

गार्गी मोहन सूर्यवंशी (१६) असे शाळकरी विद्यार्थीनीचे नाव आहे. ती कल्याण पश्चिमेतील वाडेघर भागात राहते. शनिवारी दुपारी साडे बारा वाजताच्या दरम्यान शाळा सुटल्यानंतर गार्गी शिवाजी महाराज चौक येथून बॉम्बे डाईंग दुकानासमोरून पायी जात होती. यावेळी तिला काही कळण्याच्या आत भरधाव वेगातील एका मोटार कारने जोराची धडक दिली. या धडकेत गार्गी जमिनीवर पडली. तिच्या डाव्या पायावरून मोटारीचे चाक गेले. यावेळी या विद्यार्थीनीला मदत करण्याऐवजी मोटार कार चालक घटनास्थळावरून पळून गेला. इतर पादचाऱ्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत तो पसार झाला होता. याप्रकरणी गार्गी सूर्यवंशी हिने घरी हा प्रकार सांगितला. तिच्या पालकांनी याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. मोटार क्रमांकावरून पोलीस या वाहन चालकाचा शोध घेत आहेत.

आणखी वाचा-डोंबिवलीतील मोक्का आरोपातील तीन जणांची निर्दोष मुक्तता

दुसऱ्या घटनेते, निळजे लोढा पलावा भागात राहणारे अनिकेत देशमुख (३६) सोमवारी रात्री आपल्या दुचाकीवरून शिळफाटा रस्त्याने येऊन एक्सपेरीया मॉल येथून वळण घेऊन लोढा पलावा भागात वळण घेत होते. वळण घेत असताना कल्याण दिशेने जात असलेल्या एका मोटार कार चालकाने देशमुख यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ते दुचाकीसह रस्त्यावर पडले. त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशमुख यांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कल्याण, डोंबिवलीत भरधाव वेगात वाहने चालविणाऱ्या वाहन चालकांचे प्रमाण वाढले आहे. अशा भरधाव वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.