डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील मालवण किनारा हाॅटेलमध्ये प्रवेश करताना एका तरूणाचा दुसऱ्या ग्राहकाला धक्का लागला. या विषयावरून चार जणांनी धक्का देणाऱ्या इसमाशी वाद घातला. त्याला हाॅटेल बाहेर बोलावून शिवीगाळ करत मारहाण करत, चाकूने वार करत त्याचा खून केला. या घटनेने डोंबिवलीत खळबळ उडाली आहे.या ग्राहकाला मारहाण करणारे चार अनोळखी इसम होते.

खून केल्यानंतर ते फरार झाले. ते २५ ते ३५ वयोगटातील होते. असे मानपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत तक्रारदाराने म्हटले आहे. आकाश भानू सिंग (३८) असे मृत इसमाचे नाव आहे. ते डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडीतील सरोवर बार जवळील सुरेश पाटील इमारतीत आकाश सिंग राहत होते. आकाश सिंग नवी मुंबईतील काॅल सेंटरमध्ये कामाला होते. आकाश यांचा लहान भाऊ बादल सिंग यांनी या खून प्रकरणी अनोळखी चार जणांच्या विरूध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. डोंबिवली एमआयडीसीतील मालवण किनारा हाॅटेल समोरील सार्वजनिक रस्त्यावर हा खुनाचा प्रकार रविवारी रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान घडला आहे.

बादल सिंग यांंनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की मृत आकाश सिंग आणि त्यांचे मित्र हे रविवारी रात्री एमआयडीसीतील मालवण किनारा येथे भोजनासाठी गेले होते. हाॅटेलमध्ये प्रवेश करत असताना आकाश सिंग यांचा धक्का त्याचवेळी हाॅटेलमध्ये येत असलेल्या आरोपी असलेल्या एका ग्राहकाला लागला. आपणास धक्का का मारला, असे प्रश्न अनोळखी इसम आकाश सिंग यांना करू लागला. यावेळी अनोळखी इसमाने आकाश यांना शिवागीळ करत मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. आपला चुकून धक्का लागला. आपण हेतुपुरस्सर धक्का दिलेला नाही, असे आकाश आणि त्यांचे साथीदार अनोळखी इसमाला सांंगत होते. पण तो ऐकण्यास तयार नव्हता.

त्या इसमाने आपल्या इतर सहकाऱ्यांना हाॅटेल मालवण किनारा येथे बोलावून घेतले. या चौघांनी मिळून आकाश सिंग यांना हाॅटेलमधून खेचून सार्वजनिक रस्त्यावर नेले. तेथे त्याला बेदम मारहाण करत त्याच्या सर्वांगावर चाकूने सपासप वार करून त्याला जीवे ठार मारले. चारही मारेकरी बेभान झाल्याने आकाशच्या बचावासाठी कोणीही पुढे आला नाही. सुनील कागले यांनी हिम्मत करून आकाश सिंग यांच्या बचावासाठी प्रयत्न केला. पण चारही इसमांनी त्यांच्या गालावर चाकुने वार करून त्यांनाही जखमी केले. या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दाखल तक्रारीवरून पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.