ठाणे – राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचे फलक फाडत असलेल्या तीन जणांना अटकाव करायला गेलेल्या एका २५ वर्षीय तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार कळवा येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी कळवा पोलिसांनी भीमा साळवे(३०), रोहन चव्हाण (२८), अविनाश काळे (२२) या तीन आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. दारूच्या नशेत त्यांनी फलक फाडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

राज्यात दहा दिवसांच्या सत्तानाट्यानंतर एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने जिल्ह्यात काही ठिकाणी शिंदे समर्थकांकडून अभिनंदनाचे फलक लावण्यात आले आहेत. अशाच पद्धतीचे कळवा येथील महात्मा फुले नगर भागात असणाऱ्या तुळजा भवानी मंदिराजवळ एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले होते. या परिसरातील स्थानिक रहिवासी देवानंद कांबळे हे शुक्रवारी सकाळी पाच वाजता व्यायामाकरिता बाहेर पडले. यावेळी त्यांना तीन जण शुभेच्छा फलक फाडत असल्याचे निदर्शनास आले. देवानंद यांनी त्या तीनही जणांना फलक फाडण्यापासून अटकाव केला.

परंतु, त्या तिघांनी जवळच असलेले बांबू उचलून ‘ तू येथून निघून जा, नाहीतर तुला संपवून टाकू ‘ अशी दमदाटी करत देवानंद यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या देवानंद यांनी तेथून काढता पाय घेतला. यांनतर त्यांनी घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती परिचयातील व्यक्तींना सांगून याबाबत कळवा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे कळवा पोलिसांनी भीमा साळवे, रोहन चव्हाण आणि अविनाश काळे यांच्या विरोधात जीवे मारल्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. तीनही आरोपींनी दारूच्या नशेत फलक फाडले असून त्यांचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.