डोंबिवली पूर्वेतील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरणाऱ्या एका भुरट्या चोराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून रामनगर पोलीस ठाणे हद्दीत चोरलेल्या दोन लाख रूपये किमतीच्या एकूण पाच मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

राज रमेश तावडे (२५, रा. न्यू सावली निकेतन, सरस्वती शाळेजवळ, स्मशानभूमी रस्ता, आयरेगाव, डोंबिवली पूर्व) असे आरोपीचे नाव आहे. गेल्या दोन महिन्यापासून रामनगर पोलीस ठाणे हद्दीत मोटार सायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. दुचाकी मालकांनी याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या. पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला होता. महिनभरात पाच दुचाकी चोरीला गेल्याने पोलीस चक्रावून गेले होते. चोरीच्या ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेऊन पोलीस संबंधित तरूणाचा शोध घेत होते.
दुचाकी चोरणारा एक तरूण आयरे गावातील बालाजी गार्डन संकुल परिसरात येणार आहे. अशी माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप यांना मिळाली. पोलिसांनी रात्रीच्या वेळेत बालाजी गार्डन परिसरात सापळा लावला. आयरे गाव भागात एक तरूण बुलेटवरून संशयास्पदरित्या फिरत आहे असे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्याला हटकले. तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला आडकाठी करून पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली. त्याच्याकडे बुलेटची कागदपत्र नव्हती. ती त्याच्या मालकीची नव्हती. पोलिसांनी त्याची कसून चौकशी करताच, त्याने आपण रामनगर पोलीस ठाणे हद्दीत एकूण पाच मोटार सायकल चोरल्या आहेत अशी कबुली दिली.

पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. चोरीच्या मोटार सायकल ठेवलेल्या ठिकाणी आरोपीला नेऊन त्या ताब्यात घेतल्या. आतापर्यंत राज याने किती ठिकाणी अशाप्रकारच्या चोऱ्या केल्या आहेत याची माहिती पोलीस घेत आहेत. राज पोलीस कोठडीत आहे.