अंबरनाथः मलंगगडाजवळच्या नदी पात्रात पोहण्यासाठी उरलेल्या एका २८ वर्षीय तरूणाचा बुडून मृत्यू झाला आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने हा तरूण पाण्यात बुडाला. पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मलंगगड भागात दरवर्षी हजारो पर्यटक जात असतात. यंदाच्या पावसाळ्यातील ही पहिली घटना आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन केले जाते आहे.
अंबरनाथ तालुका हा हिरवेगार डोंगर, त्यातून निघणारे धबधबे आणि निसर्गरम्य आहे. पावसाळ्यातील निसर्गाचे रूप आणखी मनमोहक असते. त्यामुळे पावसाळा सुरु झाल्याने पर्यटकांची पाउल तालुक्यातील विविध पावसाळी निसर्ग पर्यटन स्थळांकडे वळू लागली आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड हाही असाच निसर्गरम्य परिसर आहे. येथील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणारे अनेक पर्यटक नदी पात्रात पोहण्यासाठी उतरतात. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथे राहणाऱ्या सुशील गवळी या तरूणाचा मृत्यू झाला आहे.
कल्याण पूर्वेतील सुशील अनिल गवळी हा मलंगगडच्या नदी पात्रात पोहायला आला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. यंदाची मलंगगड भागातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे पर्यटकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले जाते आहे. मलंगगडाच्या डोंगरावर कोसळणाऱ्या पावसामुळे नदी पात्रात पाण्याचा प्रवाह वाढतो. त्यामुळे येथील नदीला पूर येत असते. त्यामुळे अशा काळात नदी पात्रात उतरू नये असे आवाहन केले जाते आहे. मात्र तरीही पर्यटक सातत्याने नदी पात्रात पोहण्यासाठी उतरतात.
बुडालेल्या सुशील गवळी याचा मृतदेह पोलिसांनी बाहेर काढून उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात शवविच्छेदनासाठी पाठविला होता. सायंकाळच्या सुमारास घडलेल्या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांना देखील या दुर्घटनेची माहिती मिळाली नव्हती.
या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या पर्यटन स्थळांवरील निर्बंधांच्या यादीत मलंगगडाचाही समावेश करावा अशी मागणी काही स्थानिकांकडून केली जाते आहे. मात्र या स्थानिकांमध्ये मतमतांतरे आहेत. पावसाळी पर्यटनावर आधारित खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या व्यवसायाचा हा काळ आहे. त्यामुळे सरसकट बंदी घालण्यापेक्षा काही निर्बंध लादावेत, पर्यटकांना सूचना द्याव्यात अशीही मागणी स्थानिकांकडून केली जाते आहे.