डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेत खाडी किनारा भागात, माणकोली उड्डाण पूल, मोठागाव ते कोपर नवीन रेल्वे समांतर रस्ता भागात रात्रीच्या वेळेत अधिक प्रमाणात अंमली पदार्थांचे विक्री व्यवहार वाढत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. दिवसाढवळ्या बेरोजगार, शिक्षण, नोकरी व्यवसाय नसलेले तरूण या भागातील झुडपे, पडिक इमारतींचे आडोसे घेऊन गांजा सेवन करत असल्याचे दृश्य आहे. अशाच प्रकारच्या चार तरूणांना पकडून त्यांच्यावर विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुंगीकारक द्रव्य प्रतिबंधक कायद्याने गुन्हे दाखल केले आहेत.

आपल्या पोलीस ठाणे हद्दीत मद्य विक्री, अंमली पदार्थ विक्री, गांजा सेवन, हातभट्टीची दारू विक्री, काही गैरधंदे सुरू नाहीत याची तपासणी करण्यासाठी विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. ए. लोखंडे, हवालदार शशिकांत रायसिंग, हवालदार मोरे आणि पथक पोलीस ठाणे हद्दीत दुपारच्या वेळेत गस्त घालत होते. साहाय्यक पोलीस निरीक्षक लोखंडे यांना गुप्त माहितगारातर्फे माहिती मिळाली की डोंबिवली पश्चिमेतील कैलासनगर भागात मंगलमूर्ती रेसिडेन्सी इमारतीच्या बाजुला पडिक भागात एक इसम दिवसा गांजा सेवन करत आहे. या गांजाच्या धुरामुळे परिसरातील रहिवासी त्रस्त आहेत.

लोखंडे यांनी तात्काळ आपले पोलीस वाहन कैलासनगरच्या दिशेने वळविले. दिलेल्या ठिकाणी पोहचताच त्यांना व पथकाला दूरवरून एक इसम एका इमारतीच्या आडोशाने हातावर तंबाखु सदृश्य पदार्थ घेऊन तो रिकाम्या सिगारेटमध्ये भरून तोंडाने ओढत होता. त्याच बरोबर सिगारेट शिलगावत नाका, तोंडातून धूर सोडत होता. या धुरामुळे या भागातील वातावरण प्रदुषित झाले होते. हाच तो गांजा सेवन करणारा इसम असावा असा विचार करून पोलिसांनी चारही बाजुने कडे करून या तरूणाला पळून जाण्याची संधी न देता त्याला घेरून पकडले.

पोलिसांनी पकडताच तो हातामधील गांजाची सिगारेट टाकून पळण्याचा प्रयत्न करू लागला. पोलिसांनी त्याला पकडून ठेवले. त्याने आपले नाव सिध्देश मधुकर साटम (२२) असल्याचे सांगितले. तो काळुनगर मधील शिवलिला इमारतीत राहतो. पोलिसांनी सिध्देश विरूध्द अंमली पदार्थ सेवनाचा, गुंगीकारक द्रव्य मनोविकार कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.

अशाच पध्दतीने कैलासनगरमध्ये मंगलमूर्ती रेसिडेन्सीच्या लगतच्या पडिक मोकळ्या जागेत गांजा सेवन करणाऱ्या शुभम प्रवीण आरगे (२१) या तरूणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तो सखारामनगर काॅम्पलेक्स मधील मधुबन निवासमध्ये राहतो. याच जागेतून पोलिसांनी अथर्व प्रदीप कोळंंबेकर (२१) याला गांजा सेवन करताना ताब्यात घेतले. तो शिक्षण घेतो. तो शास्त्रीनगरमधील शीवआज्ञा इमारतीत राहतो.

सोमनाथ भिमसेन गुंजाळ (२१) या तरूणाला पोलिसांनी गांजा सेवन करताना पकडले आहे. तो वडारवाडी, कोपर रोड भागात राहतो. गुंगीकारक औषधे आणि मनोव्यापार या कायद्याने पोलिसांनी या तरूणांविरुध्द गु्न्हे दाखल केले आहेत. विष्णुनगर पोलिसांनी मोठागाव रेल्वे फाटकाजवळून कोपर भागात जो नवीन रस्ता झाला आहे. त्या भागात गस्त वाढवावी. त्या भागात दुपार ते रात्री उशिरापर्यंत गर्दुल्ले, गांजा सेवकांची गर्दी असते, अशा तक्रारी या भागात दुपार, संध्याकाळी फिरण्यास जाणाऱ्या नागरिकांनी केल्या.