डेंग्यू अब्जावधी रुपयांचा आजार!

खाद्या विषयाची गहनता किंवा तीव्रता ही त्या विषयावरील सरकारी आकडेवारीवरून दिसून येते. पण त्या विषयावरील सरकारी आकडेवारी कितीही अभ्यासपूर्ण असली तरी ती विश्वासार्ह असतेच असे नाही.

खाद्या विषयाची गहनता किंवा तीव्रता ही त्या विषयावरील सरकारी आकडेवारीवरून दिसून येते. पण त्या विषयावरील सरकारी आकडेवारी कितीही अभ्यासपूर्ण असली तरी ती विश्वासार्ह असतेच असे नाही. आता डेंग्यू या महाभयानक आजाराचेच पाहा ना.. भारतात डेंग्यूबद्दल केलेले संशोधन आणि आकडेवारी या आजाराचे ‘बहुपदरी संकट’ अधोरेखित करण्यासाठी पुरेसे नाही..
आकडय़ांचा खेळ
वृत्तपत्रांमध्ये अनेकदा डेंग्यू या विकाराचे रुग्ण आणि त्यामुळे होणारे मृत्यू यांची आकडेवारी दिलेली असते, मात्र अनेकदा ती फसवी असते किंवा पुरेशी नसते. दिल्लीसारख्या शहरात तर अनेक जणांना या विकाराचा प्रादुर्भाव झालेला असतो, मात्र सरकारी आकडेवारी मात्र चुकीचे आकडे दाखवते. १२० कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात केवळ २० हजार ५०० जणांनाच डेंग्यूची लागण झालेली आहे, असे सरकारी आकडेवारी दाखवते. मात्र ही पोकळ आकडेवारी डेंग्यूचे महाभयंकर संकट अधोरेखित करीत नाही. ‘सर्वसामान्यांचे दु:ख’ झालेला हा विकार दुर्लक्ष करण्याजोगा नाही आहे. या विकाराविषयी परिपक्व सार्वजनिक चर्चा केल्यास मानवी जीवनासाठी हा विकार किती संकटधारी आणि आर्थिक ओझे टाकणारा आहे हे जाणवते. त्यामुळे या आजाराबाबतची खरी आकडेवारी तयार करण्याची गरज आहे. अमेरिकेतील ब्रॉन्डिज विद्यापीठातील डोनाल्ड शेफर्ड या संशोधकाच्या नेतृत्वाखाली भारत व अमेरिकेतील संशोधकांनी डेंग्यू विकाराची अभ्यासपूर्ण आकडेवारी तयार केली. ७ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या या आकडेवारीमुळे सरकारी आकडेवारीतील फोलपणा दिसून येतो. दरवर्षी ५८ लाख भारतीयांना डेंग्यूंची लागण झाल्याचे ही आकडेवारी सांगते. सरकारी आकडेवारीपेक्षा ही संख्या २८२ पट अधिक आहे. जगातील अन्य देशांपेक्षा भारतात या आजाराने ‘महाभयानक’ स्वरूप धारण केले आहे, हेच या आकडेवारीतून दिसून येते. या आकडेवारीच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित करत प्रा. शेफर्ड सांगतात, की ही आकडेवारी किती अभ्यासपूर्ण आहे याचे ठोस पुरावे आमच्याकडे आहेत. ठोस कार्यप्रणालीवर आधारित ही आकडेवारी भारत किंवा अन्य देशांच्या सरकारी आकडेवारीचा फोलपणा दाखवून देते. ‘‘डेंग्यूच्या प्रादुर्भावासंबंधी आकडेवारी तयार करणाऱ्या आमच्या संशोधकांनी महाराष्ट्रासह भारतातील १८ राज्यांमधील डेंग्यू विकारग्रस्त रुग्णांचा अभ्यास केला. या राज्यांमधील सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन डेंग्यूचा प्रादुर्भाव आणि या विकाराचे बहुपदरी संकट आणि त्यामुळे होणारे मृत्यू यांचे अभ्यासपूर्ण संशोधन केले आणि त्यासंबंधीचा अहवाल तयार केला,’’ असे प्रा. शेफर्ड यांनी सांगितले. सरकारी आकडेवारी आणि या रुग्णालयांमधील वैद्यकीय नोंदींद्वारे तयार केलेली आकडेवारी यामध्ये खूपच फरक दिसतो. या संशोधकांची आकडेवारी डेंग्यूचे भारतातील ‘महासंकट’ अधोरेखित करते. वाढते नागरीकरण आणि स्वच्छतेबाबत उदसिनता आदी कारणांमुळे भारतात या विकाराचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात होत आहे.

चाचण्यांकडे दुर्लक्ष
डासांमुळे प्रादुर्भाव होणाऱ्या या आजाराची ताप, डोकेदुखी,  थकवा ही लक्षणे असली तरी कधी कधी या विकारात मोठय़ा प्रमाणात रक्तस्राव होऊ शकतो. डेंग्यू केवळ भारतातच नव्हे तर अनेक देशांमध्ये सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक ठरलेला आहे. दरवर्षी तब्बल २० हजार रुग्ण या महाभयानक आजाराने दगावतात. भारतासारख्या देशात आजही पावसाळय़ात पाण्याची डबकी तयार होतात. साचलेल्या या पाण्यात एडिस नावाचे डास अंडी टाकतात आणि याच पाण्यामुळे डेंग्यू या आजाराचा प्रादुर्भाव होतो. डेंग्यूच्या महासंकटाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. डेंग्यूची तपासणी दोन प्रकारे केली जाते. तापाची लक्षणे पाहून ही तपासणी केली जाते. डेंग्यूची लागण झाल्यानंतर पहिल्या पाच दिवसांत ‘एनएस१’ ही तपासणी केली जाते. मात्र सरकारी आकडेवारी ‘एनएस१’ला गांभीर्याने पाहत नाहीत. ‘एनएस१’ हे डेंग्यू झाल्याचे निदान नाही, केवळ प्रयोगशालेय तपासणीद्वारे डेंग्यू झाल्याचे निदान झाले असेल, तरच ते सरकारी आकडेवारीतून दिसून येते. प्रयोगशालेय तपासणी दुर्मीळ असून, डेंग्यूने महाभयंकर स्वरूप प्राप्त केल्यानंतरच ती होते. प्रा. शेफर्ड यांनी नेमके या पद्धतीवरच बोट ठेवले आहे. ‘एनएस१’ चाचणीही महत्त्वाची असून, डेंग्यूचे प्राथमिक लक्षण तपासण्यात तिचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. अमेरिका किंवा इतर प्रगत देशांमध्ये या चाचणीला ग्राह्य धरूनच सरकारी आकडेवारी तयार केली जाते. मात्र भारतात ही चाचणी गांभीर्याने होत नसल्याने डेंग्यूचे महाभय दिसून येत नाही. केवळ भारतच नाही, तर ब्राझील या विकसनशील देशातही डेंग्यू विकाराने महासंकट निर्माण केले आहे. दक्षिण आणि आग्नेय आशियात तर हा रोग धोकादायकच बनला आहे. भारतासारख्या देशात सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने या धोक्याकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संशोधकांनी डेंग्यूमुळे होणाऱ्या आíथक चुराडय़ाकडेही लक्ष वेधले आहे. ‘‘डेंग्यूवर मात करण्यासाठी अनेक देशांमध्ये लोकप्रतिनिधी कोटय़वधींचा खर्च करत आहेत. अनेक देशांमध्ये ५५ कोटी डॉलरपेक्षा अधिक खर्च या विकाराच्या उपचार आणि देखभालीसाठी खर्च केला जातो. हा वैद्यकीयदृष्टय़ा अतिरिक्त खर्च आहे. रुग्ण आणि त्याचे नातेवाईकही मोठय़ा प्रमाणात उपचारासाठी खर्च करतात. भारतात तर दरवर्षी डेंग्यूवर ११० कोटी डॉलरचा व्यय होत असून हा फुकाचा आर्थिक व्यय आहे,’’ असे प्रा. शेफर्ड सांगतात.

भारताने काय करावे?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवडय़ातच ‘स्वच्छ भारत’ अभियानास सुरुवात केली. डेंग्यूसारख्या विकाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. स्वच्छतेबाबत उदासिन असलेल्या या देशात जनजागृतीची गरज आहे. पोलिओच्या विकारावर मात करण्यासाठी भारत सरकारने अनेक उपाययोजना केल्या. तसेच डेंग्यूचे महासंकट लक्षात घेऊन अनेक वैद्यकीय उपाययोजनांची गरज आहे. तर खरा निरोगी भारत दृष्टिपथात येईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Thats इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: An overview on dengue cost of illness

Next Story
महासत्तेची महाकुरूपता
ताज्या बातम्या