मोहोरी गावात पोहोचायला अजून २०० मीटर दरी उतरायची, अन् ३०० मीटर चढायची आहे, हे पाहून खरं तर आम्ही खचलोच. सकाळपासनं सहा तासांच्या चालीनंतर आता गरज होती थोडी विश्रांती आणि पोटपूजेची! दरीच्या पोटापाशी एक अफलातून ओढय़ापाशी इथेच बनवलेल्या फक्कड सँडविचचा फन्ना उडवला. इथंच आमच्या वाटाडय़ांना निरोप दिला. मोहोरी गावच्या शेवटच्या ३०० मीटर चढावरून उजवीकडे, दरीपल्याड रायगड उन्हांत तळपताना दिसत होता. वाटेतल्या भरीच्या राउळापर्यंत वाट रमतगमत चढली, पण पुढच्या छातीवरच्या उभ्या चढानं घामटं काढलं. उतारावरचं झाडं न् झाड, गवताचं पातं न् पातं गावकऱ्यांनी खुडलेलं. अखेर तब्बल आठ तासांच्या चालीनंतर आम्ही मोहोरी गावात पोहोचलो. ट्रेकर्सना फारशी परिचित नसणारी एक नवी निसणीची वाट चालल्यानं खूप भारी वाटलं. या भूभागांत ठळक खाणाखुणा नाहीत. स्वत: वाटा शोधणे जरा अवघड गेलं असतं. ही वाट फक्त अस्सल ट्रेकर्ससाठी आणि सह्याद्रीच्या भक्तांसाठीच आहे.
मोहोरी गावच्या पश्चिमेला एक विलक्षण ‘कवतिक’ दडलंय, ते म्हणजे ‘रायिलग पठार’. रायिलग पठाराबद्दल आम्ही इतकं काही वाचलं-ऐकलं होतं, की मोहोरी गावात सॅक्स ठेवून आम्ही सुसाटलोच.
उत्तरेकडे अन् पूर्वेकडे पसरलेल्या दऱ्या, घळी, झाडोरा अन् कातळमाथ्यांची चांगलीच ओळख पटत होती. पाठीवरचं ओझं घेऊन, तास न् तास अन् उन्हा-तान्हांतून चढउतार करण्याचा अट्टहास का करावा, याचं बिनतोड उत्तर मिळालं रायिलग टोकावर! एक थरारक, अप्रतिम निसर्गदृश्य! जेमतेम हजार फुटांवर िलगाण्याचा रौद्र सुळका, पल्याड खोलवर काळ नदीचं खोरं आणि मागं उठावलेला रायगडाचा विराट पहाड!
साक्षात शिविलगास्वरूप भासणाऱ्या िलगाण्याच्या काळ्याकभिन्न सुळक्याचं दर्शनच थरकाप उडवणारं! एकावर एक कातळाचे थर, घसरडय़ा गवताचे टप्पे, कुठं अवघड जागी कोरलेली पाण्याची टाकी अन् गुहा, यामुळे िलगाण्यावरची नजर हटतच नाही. तीव्र उतारावरच्या घसाऱ्यामुळे अन् जबरदस्त दृष्टिभयामुळे िलगाणा आरोहण आव्हानात्मक कातळारोहणाशिवाय शक्य नसलं, तरी त्याच्या रांगडय़ा सौंदर्यावर कैक जण भुलले आहेत.
पल्याडच्या काळ नदीच्या खोऱ्यात विलक्षण गूढ संधिप्रकाश दाटलेला. पाठीमागे रायगडाच्या माथ्यापाशी टेकू पाहणारा सूर्य! असं वाटलं, की दिवसभर तळपून थकलेल्या सूर्याला विसावण्यासाठी, त्याच्या तोडीस तोड रायगडमाथाचं हवा! अंधार दाटू लागला, म्हणून अगदी नाइलाजानं रायिलग पठाराला अलविदा केलं.
‘लिंगाणा प्रदक्षिणा – निसणीची नाळ आणि सिंगापूर नाळ’ ही संपूर्ण ब्लॉगपोस्ट वाचण्यासाठी
पूवार्ध – http://www. discoversahyadri.in/2013/01/blog-post_20.html
उतरार्ध – http://www. discoversahyadri.in/2013/02/blog-post_3.html
संग्रहित लेख, दिनांक 5th Feb 2014 रोजी प्रकाशित
लिंगाणा प्रदक्षिणा
मोहोरी गावात पोहोचायला अजून २०० मीटर दरी उतरायची, अन् ३०० मीटर चढायची आहे, हे पाहून खरं तर आम्ही खचलोच. सकाळपासनं सहा तासांच्या चालीनंतर आता गरज होती थोडी विश्रांती आणि पोटपूजेची!
First published on: 05-02-2014 at 09:35 IST
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lingana circumnavigate