केरळ सरकारच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या ओणम विशेष थिरुवोनम बम्पर २०२० लॉटरीचा निकाल लागण्याच्या काही तास आधी तो मित्रांना भेटला. तेव्हा बोलता बोलता त्याने यंदा मला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस लागणार आहे असं म्हटलं आणि त्याच्यासहीत त्याचे मित्रही जोरजोरात हसू लागले. मात्र रविवारी संध्याकाळी या लॉटरीचा निकाल लागला तेव्हा इडुक्की जिल्ह्यातील या छोट्याश्या गावात राहणाऱ्या २४ वर्षीय अनंथू विजयन याला स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ज्या तिकिटाला पहिल्या क्रमांकाचे १२ कोटींचे बक्षिस लागलं ते तिकीट आपलं असल्याचं अनंथूला खरंच वाटत नव्हतं. मात्र तो या लॉटरीमुळे रातोरात करोडपती झाला आहे.

मूळचा इडुक्कीमधील थोवालामधील कट्टपाना येथे राहणारा अनंथू हा सध्या एर्नाकुलम येथील कडवनाथ मंदिरामध्ये क्लार्क म्हणून काम करतो. तो त्याची दोन भावंडे आणि आई-वडिलांबरोबर राहतो. त्याचे वडील घरांना रंगकाम करण्याचं काम करतात. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये त्याच्या बहिणीची नोकरी गेली. कोच्चीमध्ये एका खासगी कंपनीत अकाऊटंट म्हणून काम करणारी बहीण बेरोजगार झाली होती, अंस न्यूज १८ मल्याळमने दिलेल्या वृत्ता म्हटलं आहे. “माझ्या तिकिटावरील क्रमांक पाहिल्यानंतर मी एवढी मोठी लॉटरी जिंकलोय यावर विश्वास बसण्यासाठी मला काही तास लागले,” अशी पहिली प्रतिक्रिया अनंथूने न्यूज १८ मल्याळमशी बोलताना व्यक्त केली आहे. लॉटरी लागल्यानंतर मला रात्रभर झोपच आली नाही. सकाळी उठल्या उठल्या मी घरी फोन करुन याबद्दल माहिती दिली तर घरच्यांचाही पहिल्यांदा यावर विश्वास बसला नाही, असं अनंथू सांगतो.

मल्याळम मनोरना या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार अनंथूने मंदिराजवळच बसणाऱ्या लॉटरी विक्रेत्याकडून तिकिट विकत घेतलं होतं. कर आणि इतर रक्कम वजा करुन अनंथूला ७ कोटी ५६ लाख रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अनंथूच्या वडिलांनाही याच लॉटरीचे तिकीट काढलं होतं. मात्र त्यांच्या पदरी निराशा आली. असं असलं तरी मुलाला पाहिल्या क्रमांकाचे बक्षिस लागल्याचे ऐकून अनंथूच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. यापूर्वीही अनंथूला पाच हजारांची लॉटरी लागली होती.

मागील बऱ्याच काळापासून आपल्या पडक्या घराची डागडुजी करण्यासाठी अनंथू आणि त्याचे कुटुंबिय सरकारी मदतीची वाट पाहत होते. अनेकदा प्रयत्न करुनही कोणत्याही सरकारी योजनेअंतर्ग त्यांना मदत मिळाली नाही. अनंथूचे घर हे अशा ठिकाणी आहे जिथे बारा महिने पाण्यासाठी झगडावे लागते. घरातील कामांसाठीही येथे विकत पाणी घ्यावे लागते. समोर अनेक विषय असतानाही अनंथूने आद्याप या पैशांचे नक्की काय करायचं हे ठरवलेलं नाही असं सांगितलं आहे. पैसे प्रत्यक्ष ताब्यात आल्यानंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ. मात्र आपण आपलं काम सोडणार नाही, अंस अनंथूने स्पष्ट केलं आहे. अनंथूबरोबरच इतर सहा विजेत्यांना प्रत्येकी एक कोटीचे बक्षिस मिळालं आहे.