सहा वर्षांचं शेमडं मुलं काय करू शकतं? असं जर तुम्हाला वाटत असेल तर मग जरा थांबा आणि हा व्हिडिओ बघा… तुम्हालाही जमणार नाही अशा वेगात हा एवढासा चिमुरडा अगदी भराभर गोल पोळ्या लाटतोय. तुम्हालाही विश्वास बसत नाहीय ना? अनेकांचंही सुरूवातीला असंच झालं होतं. आपण पोळ्या लाटायला घेतल्या की गोल तर सोडाच पोळपाटावर नुसते या ना त्या राज्याचे नकाशे यायला सुरूवात होतात. पण याचं मात्र तसं नाहीय, जिथे तुमची एक पोळी लाटून होत नाही तोपर्यंत हा चिमुरडा पोळी लाटून मोकळाही होतो. याचा व्हिडिओ तर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तेव्हा पोळी लाटण्याच्या कामात महिलांनाही मागे टाकणारा हा ‘मास्टर शेफ’ आहे तरी कोण असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना?

तर या छोट्या मास्टर शेफचं नाव आहे, अंकित महेंद्र वाघ. अंकित पुण्यातल्या नळस्टॉप चौकात राहतो. वय वर्षे फक्त सहा असलेल्या अंकितने लहानपणापासूनच स्वयंपाकाचे धडे घेतलेत, त्यामुळे पोळ्या लाटणं असो किंवा जेवणाची इतर काम करणं असो अंकितचा या सगळ्यात हातखंड! अंकितच्या शेजारी राहणाऱ्या सुनिता शेळके मेस चालवतात. लहानपणापासून या दोन्ही कुटूंबाचा चांगलाच घरोबा. तेव्हा अंकितच बराचसा वेळ शेळकेंच्या घरीच जायचा. सुनिता यांना स्वयंपाक करताना बघून अंकितही शिकत गेला. हळूहळू स्वयंपाकातल्या एक एक गोष्टी बघून बघून त्याने आत्मसात केल्याही आणि तोही उत्तम स्वयंपाक करायला शिकला. सुनिता यांच्यासाठी पोळ्या लाटणं, भाजी कापून देणं, आमटी बनवण्यासाठी त्यांना मदत करणं ही सारी काम अंकित अगदी पटापट करतो. अर्थात केवळ आवडीनं केलेली मदत म्हणूनच. अंकित या वर्षी दुसरीत गेला. अंकितचं कुटूंब मुळचं नाशिकचं, त्याचे बाबा कामानिमित्त पुण्यात आले. अंकित शाळेत जातो आणि शाळेतून घरी आला की सुनिता काकूंना त्यांच्या कामात कधी कधी मदतही करतो.

मेसमध्ये जेवायला येणाऱ्या प्रत्येकाला एवढ्याशा अंकितला स्वयंपाक घरात छान पोळ्या लाटताना बघून फारच आश्चर्य वाटतं. मेसमध्ये तर हा छोटा मास्टर शेफ ‘चार्ली बाबा’ म्हणून प्रसिद्ध आहे. अंकित चार्ली चॅप्लिनच ‘जबरा फॅन’ आहे, म्हणून त्याला सगळ्यांनी हेच नाव ठेवलं. तेव्हा या सहा वर्षांच्या अंकितला स्वयंपाकघरात एवढ्या हुशारीने काम करताना पाहून नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या तरूणींनाही त्याचा हेवा वाटला नसेल तर नवल वाटायला नको.